आदर्श पाऊल! अंत्यविधीसाठी गॅसदाहिनी वापरणारी नारायणगाव ग्रामपंचायत जिल्ह्यात ठरली पहिली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 04:23 PM2020-08-17T16:23:40+5:302020-08-17T16:39:52+5:30
ग्रामपंचायतीच्या वतीने अंत्यविधीसाठी मोफत गॅस सुविधा उपलब्ध करण्याचा देखील मानस
नारायणगाव: नारायणगाव येथील वैकुंठधाम येथे अदयावत गॅसदाहिनी बसविण्यात आले असून ग्रामपंचायतीच्या वतीने अंत्यविधीसाठी मोफत गॅस सुविधा उपलब्ध करण्याचा मानस असून लवकरच त्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. पुणे जिल्हयात गॅसदाहिनी प्रकल्प राबविणारी पहिली ग्रामपंचायत नारायणगाव असणार आहे, अशी माहिती सरपंच योगेश उर्फ बाबु पाटे यांनी दिली.
नारायणगाव येथील ब्राम्हण संघाच्या पुढाकाराने व अनेक संस्थांच्या सहकार्याने नारायणगाव येथील वैकुंठधाम येथे अदयावत गॅसदाहिनी बसविण्यात आली आहे. या गॅसदाहिनीमध्ये दोन जणांचे अंत्यविधी करण्यात आलेले आहेत. याबाबत सरपंच योगेश उर्फ बाबु पाटे म्हणाले की, या गॅसदाहिनीमुळे प्रदुषणाचा प्रादुर्भाव कमी होणार आहे. तसेच अंत्यविधीसाठी लागणारे पाच ते सहा मण सरपण देखील वाचेल व पर्यायाने होणारा ४ ते ५ हजार रूपये खर्चही वाचणार आहे. पावसाळयात लाकडे ओले असल्यामुळे अंत्यविधीसाठी होणारा त्रासही या अत्याधुनिक गॅसदाहिनीमुळे वाचणार आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने अंत्यविधीसाठी मोफत गॅस सुविधा उपलब्ध करण्याचा मानस असून लवकरच त्याबाबत निर्णय ग्रामसभेत घेण्यात येणार आहे. गॅसदाहिनीद्वारे अंत्यविधीसाठी एक तास कालावधी लागणार आहे, अशी माहिती सरपंच योगेश पाटे यांनी दिली.
............................
पुन्हा एकदा सरपंचाकडून माणुसकीचे दर्शन
कोरोनाबाधित मृत लोकांचे अंत्यविधी करून माणुसकीचे दर्शन घडविणारे नारायणगावचे सरपंच योगेश उर्फ बाबु पाटे यांनी पुन्हा एकदा आदर्श घालून दिला आहे. शनिवारी (दि १५) अंत्यविधी सुरू असताना गॅसदाहिनीमध्ये अचानक स्फोट झाला. त्यामुळे अर्धवट विधी झालेला मृतदेह असल्याने लाकडाच्या सहाय्याने उर्वरीत विधी करण्याचे ठरले. याची माहिती सरपंच पाटे यांना समजताच ते तिथे आले आणि तात्काळ मृतांच्या नातेवाईकांना धीर देत उर्वरीत विधी गॅसदाहिनीमध्येच करणार अशी भूमिका स्पष्ट केली. स्फोटामुळे गॅसद्वारे विधी न करता थेट गॅसदाहिनीला नुकसान होण्याचा धोका असताना देखील लाकडांच्या साहाय्याने अंत्यविधी पूर्ण केला.याबद्दल नातेवाईकांनी सरपंच योगेश पाटे यांचे आभार व्यक्त केले.