Tomato Price : नारायणगावला टोमॅटोचे भाव कोसळले; ९ हजार क्रेटची आवक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 07:30 PM2023-08-10T19:30:29+5:302023-08-10T19:31:15+5:30
बुधवारी टोमॅटोच्या २० किलोच्या क्रेटला ३०० ते १,२०० रुपये बाजारभाव मिळाला, तर गुरुवारी (दि.१०) रोजी ९ हजार क्रेटची आवक होऊन प्रतिक्रेट ७०० ते १,००० रुपये बाजारभाव मिळाला आहे...
नारायणगाव (पुणे) : टोमॅटोने शेकडो शेतकऱ्यांना मालामाल केले आहे. ३१ जुलैला टोमॅटोच्या २० किलोच्या क्रेटला सर्वाधिक ३,१०० रुपये बाजारभाव मिळाला होता. तथापि, बाहेरील राज्यातील लोकल टोमॅटो मार्केट, तसेच नाशिक, पिंपळगाव बसवंत येथील टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झाल्याने टोमॅटोचा बाजारभाव कोसळला आहे. बुधवारी टोमॅटोच्या २० किलोच्या क्रेटला ३०० ते १,२०० रुपये बाजारभाव मिळाला, तर गुरुवारी (दि.१०) रोजी ९ हजार क्रेटची आवक होऊन प्रतिक्रेट ७०० ते १,००० रुपये बाजारभाव मिळाला आहे.
दरम्यान, राज्यात २ नंबरची असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रात एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये १७ लाख ९९ हजार ५५ क्रेटची खरेदी- विक्री होऊन बाजार समितीमध्ये १०७ कोटी ४४ लाख ५२ हजार ३०० रुपयांची उलाढाल झाली आहे, अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट संजय काळे यांनी दिली. नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये उत्तर पुणे जिल्ह्यासह नगर जिल्ह्यातील शेतकरी आपला टोमॅटो विक्रीसाठी नारायणगाव येथे येतात. यावर्षी शेतकऱ्यांना टोमॅटो विक्रीमधून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
सभापती संजय काळे म्हणाले की, नारायणगाव येथील उपबाजार केंद्रात ३१ जुलै रोजी ८०१० टोमॅटो क्रेटची आवक होऊन १,००० ते ३,१०० रुपये प्रतिक्रेट, असा उच्चांकी बाजारभाव या चार महिन्यांच्या कालावधीत मिळाला आहे. एप्रिल महिन्यात एकूण १ लाख ४,८६० टोमॅटो क्रेटची आवक होऊन १ कोटी ६२ लाख ९४ हजार १८७ रुपयांची उलाढाल झाली आहे. या महिन्यात टोमॅटो क्रेटला सरासरी ५० रुपये ते ३५० रुपये, असा बाजारभाव मिळाला आहे.
सर्वाधिक दर जुलै महिन्यात
मे महिन्यात ४ लाख ६ हजार २७० टोमॅटो क्रेटची आवक होऊन क्रेटला सर्वसाधारणपणे ३० ते २७० रुपये प्रतिक्रेट, असा बाजारभाव मिळून ४ कोटी ६७ लाख ४ हजार ५६२ रुपयांची उलाढाल झाली आहे. जून महिन्यात ८ लाख ६८ हजार क्रेटची आवक होऊन ४१ कोटी ७९ लाख ६९ हजार ४६० रुपयांची उलाढाल झाली. या महिन्यात सरासरी १०० ते ३०० रुपये आणि १९ जूननंतर ४०० ते १,४०० रुपये प्रतिक्रेट, असा बाजारभाव मिळाला आहे. सर्वाधिक दर जुलै महिन्यात मिळाला आहे, या महिन्यात टोमॅटोची केवळ ४ लाख १९ हजार ८७० क्रेटची आवक झाली. टोमॅटोचे कमी उत्पादन होत असल्याने उच्चांकी असा बाजारभाव प्रतिक्रेट मिळाला आहे, या महिन्यात पहिल्या आठवड्यात ८०० ते २,५०० रुपये आणि शेवटच्या आठवड्यात १,००० ते ३,१००, असा बाजारभाव मिळाला आहे. या महिन्यात सर्वाधिक अशी ५९ कोटी ३४ लाख ८० हजार १२५ रुपये टोमॅटोची खरेदी- विक्री झाली आहे.
हजार तरुणांना रोजगार
नारायणगाव येथील उपबाजार केंद्रात दिल्ली, कर्नाटक, गुजरात, ओडिशा, मध्य प्रदेश या राज्यांतील सुमारे ४० ते ५० व्यापारी टोमॅटो खरेदीसाठी आलेले आहेत, तर राज्यातील नागपूर, अमरावती आणि स्थानिक, असे १०० हून अधिक व्यापारी टोमॅटो खरेदी करीत आहेत. टोमॅटो, भाजीपाला मार्केटमुळे स्थानिकसह अन्य भागांतील सुमारे १,००० तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव रूपेश कवडे आणि नारायणगाव उपबाजार समितीचे व्यवस्थापक शरद घोंगडे यांनी दिली.