Narendra Dabholkar murder case: किती अंतराने गोळ्या झाडण्यात आल्या? प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची उलटतपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 03:44 PM2022-03-24T15:44:15+5:302022-03-24T15:46:41+5:30
उलटतपासणी २९ मार्चला होणार...
पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (narendra dabholkar) यांची हत्या केलेल्या संशयित आरोपींना ओळखलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची बचाव पक्षाच्या वतीने बुधवारी (दि. २३) उलटतपासणी घेण्यात आली. आरोपींचे छायाचित्र दाखवून हेच ते होते का? तीन गोळ्या झाडण्यात आल्या, असे म्हटल्यानंतर किती अंतराने तीन आवाज झाले? सेकंदाने झाले की मिनिटाने झाले? असे विचारल्यावर साक्षीदाराला आवाज काढून दाखविण्यास सांगण्यात आले. पहिल्या ‘ठो“ नंतर दुसरा आवाज दोन मिनिटांनी आल्याचे साक्षीदाराने न्यायालयात सांगितले. याच साक्षीदाराची उलटतपासणी २९ मार्चला होणार आहे.
विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात ‘सनातन’ संस्थेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाचही आरोपींवर आरोप निश्चिती करण्यात आले. या गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या साफसफाई विभागातील कर्मचाऱ्याने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार केला आणि त्यानंतर दोघे तेथून फरार झाले, अशी साक्ष शनिवारी नोंदविली. त्यावर बचाव पक्षाचे वकील ॲड. प्रकाश साळसिंगीकर यांनी साक्षीदाराची उलटतपासणी घेतली.
सीबीआयने सादर केलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला जबाबाशिवाय इतर काहीही सांगता आलेले नाही. या प्रकरणातील फिर्यादी पोलीस उपनिरीक्षकांनी घटनेच्या दिवशी ओंकारेश्वर मंदिराजवळ नाकाबंदी असल्याचे सांगितले होते. त्यावर डॉ. दाभोलकर यांची हत्या झाली त्यावेळी रस्त्यावर किती वाहनांची वर्दळ होती? कुठल्या प्रकारची वाहने होती? त्याबाबत प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला सांगता आलेले नाही, तसेच मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे आणि आसपासच्या परिसराचे तपशीलही सांगता आलेले नाहीत. डॉ. दाभोलकरांची हत्या जिथे झाली, त्यावेळी आणखी एक ज्येष्ठ महिला स्वच्छता कर्मचारी उपस्थित असल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची उर्वरित उलटतपासणी २९ मार्चला होणार आहे, अशी माहिती ॲड. प्रकाश साळशिंगीकर यांनी दिली.