नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण: पुनाळेकर यांनी सनातनचा साधक म्हणून दिला सल्ला- सीबीआय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 04:28 AM2019-06-18T04:28:07+5:302019-06-18T06:49:09+5:30
सीबीआयच्या वकिलांचा युक्तिवाद
पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला अॅड. संजीव पुनाळेकर यांनी संशयित आरोपींचे वकील म्हणून नव्हे, तर सनातन संस्थेचे साधक म्हणून दिला आहे, असा युक्तिवाद सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी सोमवारी केला.
अॅड़ पुनाळेकर यांच्या जामीन अर्जावर विशेष सत्र न्यायाधीश आऱ एम़ पांडे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे़ या सुनावणी दरम्यान त्यांनी हा युक्तीवाद केला़ याप्रकरणी सरकारी वकिलांचा युक्तीवाद अद्याप बाकी असून पुढील सुनावणी १९ जून रोजी होणार आहे.
सीबीआयचे वकील सूर्यवंशी यांनी सांगितले की, डॉ. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद काळसकर याचा जबाब कर्नाटक एसआयटीने नोंदविला आहे. त्या जबाबात त्याने पूर्ण शस्त्र नष्ट न करता त्याचे काही सुट्टे भाग करून ठाणे येथील खाडीत फेकून द्यावे असा सल्ला अॅड. पुनाळेकर यांनी दिला असल्याचे म्हटले आहे. अॅड़ पुनाळेकर यांनी वकिली क्षेत्राची लक्ष्मणरेषा ओलांडून एक साधक म्हणून दुसऱ्या साधकाला गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे जे उर्वरित शस्त्राचे भाग दुसºया गुन्ह्यात वापरायचे होते का असा प्रश्न अॅड. सूर्यवंशी केला.
डॉ. दाभोलकर यांना तुमचा दुसरा गांधी करू असेही धमकाविण्यात आल्याचे अॅड. सूर्यवंशी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. डॉ. दाभोलकर यांना मारण्यासाठी आरोपींनी संगनमताने मोठा कट रचून तो पूर्णत्वास नेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.