गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकला का?; तत्कालीन पोलिस निरीक्षकाची न्यायालयात उलटतपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 09:17 AM2023-01-09T09:17:37+5:302023-01-09T09:20:02+5:30
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात शनिवारी न्यायालयात डेक्कन पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक एम.एस. जोशी यांची साक्ष आणि उलटतपासणी झाली. डॉ. दाभोलकर यांची हत्या झाल्याच्या दिवशीच मुख्य साक्षीदार विनय केळकर याचा जबाब नोंदविण्यात आला, असे जोशी यांनी सांगितले, तर फिर्यादीला प्रत्यक्ष गोळी झाडल्याचा आवाज ऐकल्याचे विचारले का, यावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्याच्या दिवशीच या घटनेतील मुख्य साक्षीदार विनय केळकर याचा जबाब नोंदविण्यात आला, अशी साक्ष डेक्कन पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.एस. जोशी यांनी शनिवारी न्यायालयाला दिली. मात्र, उलट तपासणीदरम्यान ज्या व्यक्तीने फिर्याद दिली. त्या व्यक्तीला गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकला का, असा प्रश्न केला का? तसेच कोणी मारले, मारून कुठे पळाले, किती वाजता मारले, असे प्रश्न फिर्यादीला विचारले का, असा सवाल जोशी यांना केला असता त्यांनी ‘नाही’ सांगितले, असे बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितले.
विशेष न्यायाधीश एस.आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर आरोपनिश्चिती करण्यात आली आहे. डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ जानेवारी रोजी होणार आहे.