Narendra Dabholkar Murder : सचिन अंदुरेच्या जप्त पिस्तुलातून गौरी लंकेश यांची हत्या, सीबीआयचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 02:14 PM2018-08-26T14:14:07+5:302018-08-26T14:34:22+5:30
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरेच्या चौकशीतून सीबीआयनं आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे.
पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरेच्या चौकशीतून सीबीआयनं आणखी एक खळबळजनक माहिती समोर आणली आहे. 'सचिन अंदुरेकडून जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलातून ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली', असा खळबळजनक दावा सीबीआयनं शिवाजीनगर कोर्टात केला आहे. हे पिस्तुल सचिनच्या मेहुण्याकडून जप्त करण्यात आले होते. सचिन अंदुरेला आज शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी सीबीआयनं हा दावा करत सचिन अंदुरेच्या कोठडीची मागणी केली. त्यानुसार सचिनला 30 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.
(डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: पंधरा दिवसांपूर्वीच पिस्तूल दिले भाऊजीला; सीबीआय चौकशीत उघड)
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यांमध्ये सचिन अंदुरे याचा समावेश असून त्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात पिस्तुल चालविण्याचे प्रशिक्षण घेतले होते, असे तपासात पुढे आले आहे. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्याबरोबर अंदुरेने हत्येचा कट रचला होता, असा दावा सीबीआयने जिल्हा सत्र न्यायालयात केला.
(गौरींच्या मारेकऱ्यांना सचिनचे प्रशिक्षण; मारेकरी अनेक वेळा आले एकमेकांच्या संपर्कात)
नालासोपारा येथे स्फोटके जप्त केल्यानंतर वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयच्या पथकाने डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित हल्लेखोर अंदुरेला अटक केली होती.
अंदुरेने झाडली तिसरी गोळी?
अंदुरे मोटारसायकल चालवित होता, त्याचा साथीदार पाठीमागे बसला होता. साथीदाराने डॉ. दाभोलकरांवर दोन गोळ्या झाडल्या तर तिसरी गोळी अंदुरेने झाडल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे दोन्ही आरोपींकडे पिस्तुल होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.