Supriya Sule: नरेंद्र मोदींचे निर्णय भाजपच्या हिताचे ठरतायेत; सुप्रिया सुळेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 03:24 PM2022-05-11T15:24:33+5:302022-05-11T15:24:39+5:30
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे महागाईविरोधात आंदोलन
पुणे : पुण्यात मोदी सरकारने केलेल्या अन्यायकारक गॅस दरवाढीविरोधात शनिपार मंदीर ( मंडई जवळ) येथील हनुमानास साकडे घालून व महाआरती करून प्रतीकात्मक निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. मोदी सरकार हाय हाय अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. जयदेवी जयदेवी जय कमळाबाई अशी आरती प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी सादर केली आहे. सुप्रिया सुळे यांनी सदर आंदोलन यापुढे संपुर्ण महाराष्ट्रात ही महागाईची आरती म्हणून पक्षााच्या वतीने गॅस व इंधन दरवाढीची आंदोलने होतील असे जाहीर केले.
सुळे म्हणाल्या, देशाची अर्थव्यवस्था कोसळत चालली आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. अशा वेळी पंतप्रधानांनी आपण एका पक्षाचे नाही तर देशाचे प्रधानमंत्री आहोत हे लक्षात ठेवून त्यादृष्टिने काम करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात त्यांचे निर्णय पक्षाच्या हिताचे कसे ठरतील याचीच काळजी ते करत आहेत अशी टीका खासदार सुळे यांनी केली.
जनसामान्यांना दिलासा दे
राज्याच्या राजकीय पटलावर राज ठाकरे यांच्यामुळे हनुमान चालिसा गाजत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी सकाळी वाढती महागाई कमी करण्यासाठी शनिपारजवळ मारूतीला साकडे घालून प्रार्थना केली. तुझ्यामुळे सगळे प्रश्न सुटतात असे काहींना वाटते, तर मग महागाईचा प्रश्नही सोडव व जनसामान्यांना दिलासा दे असेे मागणे हनुमंताजवळ मागितले असल्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.
पक्षाचे सर्व प्रमुख नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. प्रदीप देशपांडे यांनी रचलेली महागाईची आरती यावेळी म्हणण्यात आली. त्यासाठी पदाधिकाऱ्यांसह सर्व कार्यकर्ते मांडी घालून खाली रस्त्यावर बसले होते. भगवे कपडे घालून रितसर पूजा करत आरती म्हणण्यात आली. हनुमतांचे नाव घेतले की देशासमोरचे सगळे प्रश्न सुटतात असा समज काहीजणांचा झाला आहे अशी टीका शहराध्यक्ष जगताप यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केली. केंद्र सरकारच्या विरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या.