PM Modi in Pune: नरेंद्र मोदी ‘चले जाव’ आंदोलन सुरू; इंडिया फ्रंटच्यावतीने पंतप्रधानांचा निषेध
By श्रीकिशन काळे | Published: August 1, 2023 09:17 AM2023-08-01T09:17:45+5:302023-08-01T09:23:44+5:30
सकाळी ९ वाजल्यापासून मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळा येथे नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवून नरेंद्र मोदी चले जावच्या घोषणा दिल्या जात आहेत...
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उध्दव ठाकरे गट), रिपब्लिकन व डाव्या तसेच आंबेडकरवादी, पुरोगामी पक्ष संघटना यांच्या वतीने त्यांचा निषेध करण्यात येत आहे. सकाळी ९ वाजल्यापासून मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळा येथे नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवून नरेंद्र मोदी चले जावच्या घोषणा दिल्या जात आहेत. हे आंदोलन आता सुरू आहे.
मणिपूर येथील हिंसाचार व महिला अत्याचाराच्या घटनांकडे होत असलेले दुर्लक्ष तसेच संसदेला सामोरे न जाता विरोधकांचा केला जाणारा अनादर यासह केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ हे आंदोलन झाले. आंदोलनात ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी, पुणे शहर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, अभय छाजेड, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रशांत जगताप, शिवसेना (उध्दव ठाकरे गट) चे सुषमा अंधारे, संजय मोरे व गजानन थरकुटे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे, डाव्या चळवळीचे अजित अभ्यंकर, नितीन पवार, सुभाष वारे, डॉ. अभिजीत वैद्य, विश्वंभर चौधरी, शरद जावडेकर, लुकस केदारी इ. सह संबंधित पक्षांच्या प्रमुख मान्यवरांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. निषेध सभा घेऊन मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.
दरम्यान संसदीय लोकशाही परंपरा पायदळी तुडविण्याचे काम नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाकडून सुरू असून मणिपूर प्रकरणी नरेंद्र मोदी यांचा व्यवहार हा संपूर्णत: हुकूमशाही वृत्तीचा आहे. तसेच संपूर्ण देश प्रधानमंत्री यांनी संसदेत मणिपूर प्रकरणी निवेदन करावे याची वाट पाहत असताना ते टाळून प्रधानमंत्री पुणे येथे पुरस्कार व उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असल्याने त्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करीत सर्व विरोधी पक्षांच्या वतीने नरेंद्र मोदी ‘चले जाव’च्या घोषणा दिल्या.
एकीकडे मणिपूर जळत असताना पंतप्रधान पुरस्कार कसा घेतात, असा सवाल पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह सर्वांनी उपस्थित केला. आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उध्दव ठाकरे गट), रिपब्लिकन युवा मोर्चा व डाव्या चळवळीतील सी. पी. एम., सी. पी. आय., अंग मेहनती कष्टकरी समिती, सुराज्य सेना, भारत जोडो अभियान, जनता दल सेक्युलर, समाजवादी पार्टी, बी. आर. एस. पी., सी. पी. आय., एम. एल., युवक क्रांती दल, महात्मा फुले प्रतिष्ठाण, आरोग्य सेना, शिक्षण हक्क सभा, जनता दल युनायटेड, सत्यशोधक आघाडी, निर्भय बनो आंदोलन, जबाब दो आंदोलन, रिजनल ख्रिश्चन सोसायटी यांच्या सह इतर अनेक संघटना सहभागी झाल्या.