Budget 2022: मोदी सरकारचा अर्थसंकल्प निराशाजनक; शरद पवारांनी व्यक्त केली नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 12:57 PM2022-02-02T12:57:49+5:302022-02-02T12:58:05+5:30
अर्थसंकल्प गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा, अधिक हाताला काम देणारं असला पाहिजे
बारामती : मोदी सरकारचा हा सातवा अर्थ संकल्प आहे. अर्थसंकल्प गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा, अधिक हाताला काम देणारं असला पाहिजे. सर्व सामान्य लोकांची हे सरकार हळूहळू कर आखणी कमी करेल,अशी अपेक्षा होती. नोकरी आणि व्यावसाय संदर्भात अपेक्षा जास्त होत्या. पण अर्थसंकल्प पहिल्या नंतर निराशा आली आहे,अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाबाबत नाराजी व्यक्त केली. माळेगांव येथील गोविंदबाग या निवासस्थानी ज्येष्ठ नेते पवार यांनी पत्रकारांशी अर्थसंकल्पाबाबत बोलताना नाराजी व्यक्त केली.
पवार पुढे म्हणाले, सर्वसामान्य माणसाला आवश्यक दैनंदिन जीवनात आवश्यक वस्तुंच्या किंमती नियंत्रणात ठेवून महागाईला आटोक्यात आणण्यासाठी देखील अर्थसंकल्पात तरतूद असणे आवश्यक आहे. परंतु कालच्या अर्थसंकल्पात याची पूर्तता झालेली दिसत नाही. आपला देश शेती क्षेत्रात लक्ष देणारा आहे. शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी कष्ट केले. साहजिकच शेतकऱ्यांची अधिक गुंतवणूक करण्याची अपेक्षा होती. पण त्याची पूर्तता झाली नाही. निवडणूकीच्या दृष्टीने अर्थसंकल्पात काही करायचा प्रयत्न केला आहे. पण त्याचा काही फायदा होईल असं वाटत नाही. सर्वात महत्त्वाची निवडणूक ही उत्तर प्रदेश ची आहे. तेथे शेती हा महत्त्वाचा घटक आहे. शेती क्षेत्रातला वर्ग आहे ,तोच नाराज झाला आहे. त्यामुळे परिणाम निवडणूकीवर होईल अस वाटत नाही.
वायनरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळते
देशभरातील सर्वच राज्यांमध्ये दुकानांमध्ये देशी आणि विदेशी दारू मिळते. त्यामध्ये वाईनचा खप अत्यंत तुलनेने कमी आहे. देशातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात होते. या जिल्ह्यामध्ये अठरा वाईनरी आहेत. ही वाईन केवळ मोठ्या मॉल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकारने मंजुरी दिली आहे. वायनरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र त्याला विरोध होत असेल .तर सरकारने या संदर्भात काही वेळा निर्णय घेतल्यास वाईट वाटायचे कारण नसल्याचे पवार म्हणाले.