मोदीजींची फक्त खोटं बोलण्याची गॅरंटी; ते जिंकले तर संविधान, आरक्षण, निवडणूक संपवतील - संजय सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 02:59 PM2024-05-09T14:59:23+5:302024-05-09T15:00:06+5:30
मोदींनी बेरोजगारी, महागाई, काळा पैसा, १५ लाख देणे, पक्के घर देण्यावरून खोटी गॅरंटी दिली
पिंपरी : आपल्याकडे बाईकचोर, सोनेचोरानंतर देशात पक्ष चोरणारे आलेले आहेत. मोदीजींची फक्त खोटं बोलण्याची गॅरंटी आहे. बेरोजगारी, महागाई, काळा पैसा, १५ लाख देणे, पक्के घर देण्यावरून खोटी गॅरँटी दिली. देशातील जतना त्यांना हरविण्यासाठी तयार आहे. ते जिंकले, तर संविधान, आरक्षण, निवडणूक संपवतील. त्यांचे राजकारण संपविण्यासाठी निवडणूक आहे, अशी टीका आम आदमी पक्षाचे नेते, खासदार संजय सिंह यांनी सांगवीत केली. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ सांगवीतील पीडब्लूडी मैदानावर सभा झाली.
सिंह म्हणाले, शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी अरविंद केंजरीवाल यांना अटक झाल्यानंतर दिल्लीत येऊन साथ दिली. ठाकरेंनी पाठ दाखवून कोणाला धोका दिलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून हाच संदेश देतो की, ज्यांनी उध्दव ठाकरे व शरद पवार यांच्यासोबत गद्दारी केली, त्यांना माफ करू नका. देशातील जनता त्यांना हरविण्यासाठी तयार आहे. ते जिंकले, तर संविधान, आरक्षण, निवडणूक संपवतील.
अर्थव्यवस्था सांभाळता आलेली नाही: पृथ्वीराज चव्हाण
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशातील ही लोकसभेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. आर्थिक भ्रष्टाचाराबरोबर नैतिक व राजनैतिक भ्रष्टाचार मोदी सरकारकडून सुरू आहे. महागाईमुळे कंबरडे मोडले आहे. मोदी सरकार शेतक-यांचा सूड घेत आहे. देशभरात नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचंड मोठी लाट आहे. मोदी सरकारमुळे बेरोजगारीचे भूत देशाच्या मानगुटीवर बसले. नोटबंदी, जीएसटी, शेतकरी काळे कायद्यांमुळे त्यांना अर्थव्यवस्था सांभाळता आलेली नाही. डिझेल, पेट्रोलच्या किंमती वाढवून देश महागाईच्या घाईत लोटला. मनमोहन सिंह यांच्या काळातील आर्थिक विकासाचा दर राहिलेला नाही. आमदारांची खरेदी-विक्री करून सरकारे पाडली जात आहेत. त्यांच्या मान्यतेने राज्य सरकारे पाडली जातात. ना खाऊंगा, ना खाने दुंगा म्हणणा-या मोदींचे सर्वात भ्रष्ट सरकार ते चालवत आहेत. भाजपच्या काळात पिंपरी चिंचवडमध्ये सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. महागाईमुळे कंबरडे मोडले आहे. शेतक-यांचा मोदी सूड घेत आहेत.'