मोदी हे विकासाच्या दिशेने चाललेले घोडेस्वार; राहुल गांधींमध्ये त्यांना अडवण्याची ताकद नाही - रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 08:08 PM2024-04-25T20:08:44+5:302024-04-25T20:10:22+5:30
काँग्रेस साठ ते सत्तर वर्षे सत्तेत राहूनही गरिबी हटवण्यात त्यांना यश आले नाही
बारामती : इंदीरा गांधी यांनी त्यांच्या काळात गरीबी हटावचा नारा दिला. मात्र, ६० ते ७० वर्ष सत्तेत राहुन त्यांना ते जमले नाही. गरिबी हटविण्यात त्यांना यश आले नाही. भ्रष्टाचार करत काॅंग्रेस पुढे जात राहिली, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काॅंग्रेसवर टीका केली.
बारामती येथे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आठवले बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री आठवले पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाच्या दिशेने चाललेले मोठे घोडेस्वार आहेत. मोदी यांचा घोडा अडविण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांच्याकडुन होत आहे. मात्र, राहुन गांधी यांच्यात तेवढी ताकत नाही. तसा प्रयत्न झाल्यास त्यांना तुडवत मोदींचा घोडा पुढे गेल्याशिवाय राहणार नाही, असा टोला आठवले यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले,आम्ही गरीब आहोत, पण आम्ही इमानदार आहोत. ज्यांच्याशी नाते जोडतो, त्यांना आम्ही धोका देत नाही. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा मान राखुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी एकनिष्ठ राहुन आम्ही महाराष्ट्रात राजकारण केल्याचे आठवले म्हणाले. उध्दव ठाकरे यांचा थयथयाट चाललेला आहे. संजय राऊत आज उलटसुलट भाषा वापरतात. महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे, असे ते म्हणतात. मात्र, आम्ही कोणाचा पक्ष फोडलेला नाही. एकनाथ शिंदे त्यांचे आमदार घेऊन आमच्याकडे आले. उध्दव ठाकरे आम्हाला सोडुन काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेसबरोबर गेले, ती गध्दारी नव्हती का, तुम्ही असे करणे अपेक्षित नव्हते, असा सवाल यावेळी आठवले यांनी केला. अगोदर ठाकरे यांनी गध्दारी केली. भाजपच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसल्याचे आठवले म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती...भीमशक्तीची भुमिका मांडली. त्याला आम्ही पाठींबा दिला. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. ठाकरे आमच्यासोबत असते तर धनुष्यबाण कोणी हिरावुन घेवु शकले नसते. त्यांच्या ५४ आमदारांपैकी पैकी ४० आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले. बहुमत त्यांच्याकडे असल्याने चिन्ह त्यांना मिळाले, हा कायदा असल्याचे आठवले म्हणाले. अजित पवार देखील ४२ आमदार घेऊन आले. कोणाला भीती दाखविण्याची आवश्यकता नव्हती. पवार यांच्या मनात भाजपसमवेत जायचे होते, असे देखील आठवले यांनी सांगितले.
भाषणात आठवलेंच्या कविता
१)बरीच वर्ष मी होतो माननीय शरद पवार साहेबांचा साथी.. पण आता मी आहे अजितदादांचा साथी...त्यामुळे सुनेत्रा पवार यांना निवडुन आणण्यासाठी आलेलो आहे बारामती...नरेंद्र मोदींनी वाढविली विकासाची गती...म्हणुन बारामतीत विजयी होणार महायुती.
२)लढाइ आहे पवार विरुध्द पवार
आमच्या वहिनीच होणार आहे लोकसभेवर संवार.
३) हम तो नही करते बात बडी बडी
लेकीन चुनकर आनेवाली है सुनेत्रा पवार की घडी.