शिवरायांची मंदिर पुनर्निर्माण परंपरा मोदी चालवत आहेत - अमित शहा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 04:42 PM2023-02-19T16:42:25+5:302023-02-19T16:42:46+5:30
अनेक मंदिरांच्या जिर्णोद्धाराचे काम भाजपचे सरकार करत आहे
पुणे : मुघल तसेच परकीय आक्रमणांमुळे अनेक मंदिरांना उध्वस्त करण्यात आले. या विध्वंस झालेल्या मंदिरांच्या पुनर्निर्माणाचे काम छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या कृतीतून केले. त्यांच्यानंतर अनेक मराठी शासकांनी ही परंपरा सुरू ठेवली. त्याच पद्धतीने पंतप्रधान त्याच परंपरेला पुढे नेत आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.
पुण्यातील आंबेगाव येथे साकारण्यात आलेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार शिवेंद्रराजे भोसले, नाना जाधव, प्रवीण दबडगाव, जगदीश कदम उपस्थित होते.
गोव्यात नुकत्याच झालेल्या सप्तकोटेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या कामाचा दाखला देत त्यांनी छत्रपती शिवाजी माहाराज यांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेत तिरुवेन्नल्ली येथील अरुणालचम शिव मंदिरांसह अनेक मंदिरांच्या जिर्णोद्धाराचे काम केले. अनेक मंदिरांना मोठे द्वार बांधले. एकप्रकारे जो विध्वंस झाला होता, त्याचे पुनर्निर्माण करण्याचे काम केले. त्यांच्यानंतर बाजीराव पेशवे, नानासाहेब फडणवीस, माधवराव पेशवे तसेच अहिल्याबाई होळकर यांनी ती परंपरा कायम ठेवली. त्यामुळे अनेक मंदिरांची पुनर्निमितीची परंपरा कायम राहिली. ही मंदिरांची पुनर्निर्मितीची परंपरा आता पंतप्रधान नरेंद्र मोदीही पाळत असून प्रभु श्रीरामाचे मंदिराचे मंदिर तयार होत आहे. काशी विश्वेराचा कॉरिडॉरही तयार झाला आहे, सोमनाथ मंदिरही सोन्याचे होत आहे. तसेच अनेक मंदिरांच्या जिर्णोद्धाराचे काम भाजपचे सरकार करत असल्याचे सांगितले.
शिवसृष्टीची पाहणी केल्यानंतर हे ईश्वरी काम असून त्याला शिवरायांचा आशिर्वाद लाभला आहे. त्यामुळे आता हे काम थांबणार नाही, तुम्ही आम्ही पूर्ण करणारे ते कोण असा सवालही त्यांनी यावेळी केला. शिवसृष्टी तयार कऱण्यासाठी जगभरात उपलब्ध असलेल्या सत्य परिस्थिती सांगणा-या दस्तावेजांमधून ही शिवसृष्टी करणे हे मोठे काम असल्याचे सांगून दिवंगत बाबासाहेब पुंरदरे यांचे स्वप्न आता प्रत्यक्ष जमिनीवर उतरत असल्याचे ते म्हणाले. या प्रकल्पाचे कामही वेळेत पूर्ण होईल असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
इतिहासातील सूक्ष्म बाबींना संशोधनपूर्वक मांडल्याने हा प्रकल्प वैशिष्ट्यपूर्ण आहे. इतिहास आणि तंत्रज्ञानाचा सुंदर समन्वय इथे दिसून येतो. देशभरातील शिवभक्तांसाठी जगभरातील इतिहास प्रेमींसाठी हे महत्वाचे स्थळ होईल.
शिवरायांचे इतिहासात मोठे योगदान
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्याची प्रेरणा सत्ता नव्हती, तर अत्यांचारांविरुद्ध संघर्ष करण्यासाठी, स्वधर्माप्रती निष्ठेसाठी, स्वभाषेला महत्वाचे स्थान देण्यासाठी आणि स्वराज्य स्थापनेसाठी त्यांचे जीवन होते. भारतावर कुणीही अत्याचार करू शकत नाही हा संदेश त्यांनी स्वराज्य स्थापना करून जगाला संदेश दिला. त्यांचा हा विचार त्यांच्या नंतरही प्रेरणादायी ठरेला दिसून येतो. १६८० नंतरही त्यांच्या कार्याला, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम, महाराणी ताराबाई, छत्रपती शाहू महाराज यांनी पुढे नेले. स्वराज्याची ही यात्रा अटक ते कटक आणि गुजरात ते बंगालपर्यंत पोहोचली आणि संपूर्ण भारताला प्रेरणा देण्याचे सामर्थ्य त्यांच्या विचारात होते. शिवरायांनी स्वधर्म, स्वराज्य व स्वभाषेसाठी विद्रोह व संघर्ष केला. यातून स्वतंत्र भारताला चेतना देण्याचे काम केले, असेही ते म्हणाले.
शिवप्रेमी अमित शहा
शहा हे शिवरायांच्या जीवनावर एक पुस्तक लिहित असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्याचा प्रत्यय शहा यांच्या भाषणातून दिसला. शिवरायांच्या जीवनाविषयी अनेक उदाहरणांतून त्यांनी त्यांचे अलौकीक कार्य उलगडण्याचा प्रयत्न केला. शहा गेले दोन दिवस राज्याचा दौरा करत आहेत, मात्र, शिवसृष्टीच्या कार्याक्रमातील त्यांचे भाषण शिवप्रेमाचा आविष्कार होता अशी प्रतिक्रिया उपस्थितांमध्ये होती. भाषणापूर्वी त्यांन शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण करताना तेथे तब्बल दीड तास घालवला. त्यातून शिवरायांचे कार्य समजून घेण्याचा प्रयत्न केला.
तत्पूर्वी शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशिर्वादाने धनुष्यबाण मिळाल्याचा उल्लेख करत हे सामान्यांचे राज्य असल्याच्या पुनरुच्चार केला. शिवरायांच्या विचारांचा आदर्श मानून हे सरकार काम करत असून सामान्यांना सुखाचे दिवस येतील असा विश्वास आपल्या भाषणातून व्यक्त केला. शिवसृष्टी हे सर्वांसाठी संस्कार केंद्र ठरेल असेही ते म्हणाले.
फडणवीस म्हणाले, शिवसृष्टीसाठी राज्य सरकारने ५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी मदत करू. शिवसृष्टी पाहिल्यावर नवी पिढी इथून राष्ट्रपेमाचे शिवतेज घेऊन जातील, आपल्या देशाविषयी काहीतरी करण्याची उर्मी त्यांच्या मनात निर्माण होईल, आपल्या संस्कृतीविषयी अभिमान त्यांच्या मनात निर्माण होईल.