Mann Ki Baat: पुण्यात तब्बल एक हजार ठिकाणी होणार “मन की बात”
By राजू हिंगे | Published: April 28, 2023 02:55 PM2023-04-28T14:55:02+5:302023-04-28T14:55:13+5:30
शहरातील विविध सोसायटी, गणेश मंडळ व अनेक संस्था यांच्या माध्यमातून हा मन की बात कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार
पुणे : नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी देशवासियांना उद्देशून “मन की बात” मधुन संवाद साधतात. या कार्यक्रमाचे कौतुक संपूर्ण जगभर होते आहे. येत्या रविवारी ३० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता पंतप्रधानांच्या या अनोख्या उपक्रमाचा १०० भाग प्रसारित होणार आहे. 100 व्या भागानिमित्त सरकारने 100 रुपयांचं नाणं जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निमित्ताने मन की बात या कार्यक्रमाचे प्रसारण १ हजार ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी ही माहिती दिली. पुणे शहरातील प्रत्येक बुथवर मन की बात या कार्यक्रमाचे जाहीर प्रसारण करण्यात येणार आहे. शहरातील विविध सोसायटी, गणेश मंडळ व अनेक संस्था यांच्या माध्यमातून हा मन की बात कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे. पुणे शहरातील सर्व नागरिकांनी या शंभराव्या मन की बात कार्यक्रमाच्या प्रसारणात सहभागी व्हावे असे आवाहन जगदीश मुळीक यांनी केले आहे.
100 रुपयांचं नाणं कसं असेल?
'मन की बात' या बहुचर्चित कार्यक्रमाचा 100 वा भाग रविवारी प्रसारित होणार असून 100 व्या भागानिमित्त सरकारने 100 रुपयांचं नाणं जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नाणं रजत, तांबे, निकिल आणि जस्ता या चार धातूंपासून बनवण्यात आलं आहे. नाण्याच्या पुढील बाजूस अशोक स्तंभ असणार आहे. त्याच्या खाली सत्यमेव जयते असे लिहिलेले असेल. डाव्या बाजूस देवनागरीमध्ये 'भारत' तर उजव्या बाजूला इंग्रजीमध्ये 'India' असं लिहिलेलं आहे. नाण्याच्या मागच्या बाजूला 'मन की बात'च्या 100 व्या भागाचं प्रतिक असलेलं खास चिन्ह असणार आहे.