Narendra Modi: कोरोनाच्या धास्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 05:07 PM2022-01-09T17:07:16+5:302022-01-09T17:07:22+5:30
आगामी महापालिका निवडणुक, पुणे मेट्रो उदघाटन, भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा, महापालिकेच्या इमारतीमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण अशा विविध कार्यक्रमांसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ जानेवारीला पुणे दौऱ्यावर येणार होते.
पुणे : आगामी महापालिका निवडणुक, पुणे मेट्रो उदघाटन, भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा, महापालिकेच्या इमारतीमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण अशा विविध कार्यक्रमांसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ जानेवारीला पुणे दौऱ्यावर येणार होते. अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून आल्याचे सूत्रांनी दिली होती. पण महाराष्ट्र आणि पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आगामी महापालिका निवडणुक आणि मेट्रो उदघाटन या कार्यक्रमासाठी डिसेंबरअखेर पुणे दौरा निश्चित झाला होता. पण काही कारणास्तव तो एक महिना पुढे ढकलण्यात आला. पण आता संपूर्ण देशभरात कोरोर्ण रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर चे रद्द करण्यात आले आहेत.
देशातील एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबई पाठोपाठ पुण्यातही रुग्णवाढीचा वेग थांबण्याचे नाव घेत नाहीये. त्यामुळेच कालपासून संपूर्ण राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात १० जानेवारीपासून दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक सभांवर देखील बंदी घालण्यात आली आहे.
हिंजवडी मेट्रोसाठी केंद्र सरकारने दिले १२०० कोटी
हिंजवडी ते शिवाजीनगर हा देशातील पहिली पीपीपी तत्त्वावरील मेट्रो प्रकल्प आहे. पुण्यातील या प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेळ न मिळाल्याने भूमिपूजन रखडले आहे. हिंजवडी मेट्रोसाठी केंद्र सरकारने १२०० कोटी रुपये दिले आहेत. या मेट्रोचे भूमिपूजनही मोदी यांच्या हस्ते या महिन्यात होणार होते.
राज्यात नवी नियमावली
- राज्यात सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत जमावबंदी आणि रात्री 11 ते सकाळी संचारबंदी
- शाळा महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद
- मैदाने, उद्याने, पर्यटनस्थळे पूर्णपणे बंद
- स्विमिंग पूल पूर्णपणे बंद
- लोकल वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाहीत
- खासगी कार्यालयात 2 डोस घेतलेल्यांनाच परवानगी
- 2 डोस पूर्ण झालेल्यांनाच सार्वजनिक सेवेचा लाभ घेता येणार
- रेस्टॉरंट्स, नाट्यगृहे चित्रपटगृहे 50 टक्के क्षमतेनं रात्री 10 पर्यंत सुरू
- लग्नाला 50 तर अंत्यविधीला 20 जणांनाच परवानगी