मोदींनी वर्षातून एकदा तरी पुण्यात यावे; खड्डेविरहित रस्ते पाहून पुणेकरांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 02:04 PM2022-03-07T14:04:06+5:302022-03-07T14:04:48+5:30
पुणे दौऱ्यात ज्या मार्गाने मोदी जाणार आहेत, तेथील रस्ते दुरुस्ती करण्याबरोबरच रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविणे, रस्ते स्वच्छ करणे, यावर महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेने दिवस-रात्र काम केले होते
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मेट्रो उदघाटन, महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण, ई बस सेवेचे उदघाटन अशा विविध कार्यक्रमासाठी पुणे दौऱ्यावर आले होते. त्या अनुषंगाने सत्ताधारी भाजपकडून मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुभेच्छांचे बॅनरही लावण्यात आले आहेत.
त्याबरोबरच पुणे दौऱ्यात ज्या मार्गाने मोदी जाणार आहेत, तेथील रस्ते दुरुस्ती करण्याबरोबरच रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविणे, रस्ते स्वच्छ करणे, यावर महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेने दिवस-रात्र काम केले होते. त्यामुळे मोदी ज्या मार्गाने जाणार आहेत. ते रस्ते अनेक वर्षांनंतर चकचकीत आणि खड्डेविरहित दिसू लागले होते. त्यानिमित्त्ताने लोकमतने पुणेकरांशी संवाद साधला. त्यावेळी चकचकीत रस्ते पाहून मोदींनी वर्षातून एकदा तरी पुण्यात यावे अशी प्रतिक्रिया पुणेकरांनी दिली आहे.
पुणे शहरातील मध्यवर्ती भागात रस्त्यांची अवस्थ अंत्यत बिकट आहे. अनेक ठिकाणी खड्डे, चेंबर्स यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत आहे. यामुळे पुणेकर खूपच त्रस्त आहेत. रस्त्यांवरील या खड्ड्यामुळे छोट्या - मोठ्या अपघातांचे प्रमाणही वाढू लागले आहे. नागरिकांकडून वारंवार पुणे महापालिकेकडे तक्रारी केल्या जातात. पण पालिकेकडून तात्पुरती डागडुची केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मोदी येणार म्हणूनच रस्ते दुरुस्ती
मोदी येणार आहेत म्हणूनच रस्ते दुरुस्त करण्यात आले. मग दरवर्षी मोदींनी पुण्यात एक फेरफटका मारावा. म्हणजे पुणेकरांना चांगल्या रस्त्याने प्रवास करता येईल. महापालिका नावालाच रस्ते दुरुस्त करत असल्याचे दिसून येत आहे. जर त्यांनी पुढाकार घेऊन गल्ली बोळ आणि प्रमुख रस्ते व्यवस्थित केले. तर अनेक समस्या सुटतील असे काही नागरिकांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे.
''माननीय पंतप्रधान पुण्यात आले आणि ते ज्या रस्त्यांवरून जाणार होते तिथे डांबरीकरण केले गेले. आयत्या वेळी प्लॅन बदलून जर ते वेगळ्या रस्त्यांवरून गेले असते तर पुण्याबाहेर पडायला २०२४ उजाडलं असतं अशी प्रतिक्रिया संजय अहिनावे यांनी दिली आहे.''
''मोदींनी पुढच्या वेळी येताना पुण्यातल्या सगळ्या गल्ली बोळातून फेरफटका मारावा म्हणजे त्या निमित्ताने निदान सगळे रस्ते तरी व्यवस्थित होतील असं सुशीला घाटे म्हणाल्या आहेत.''
''अतिथि देवो भव: म्हणून बाहेरून येणाऱ्यांचा पाहुणचार करण्याची आपली पद्धत आहे पण म्हणून फक्त बाहेरचे येणार म्हणूनच तेवढ्यापुरती विकासकामं करायची आणि बाकी पुणे ५ वर्षे खोदून ठेवायचं हे काही योग्य नाही असे अजय शिंदे याने सांगितले आहे.''