Narendra Modi Temple Pune : पुण्यातील मोदींचं मंदिर का हटवलं? मंदिर बांधणाऱ्या मयूर मुंडेंनी सांगितलं त्यामागचं 'हे' कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 06:44 PM2021-08-19T18:44:29+5:302021-08-19T18:45:24+5:30
पुण्यातील औंध येथे चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंदिर बांधण्यात आलं होतं. पण अवघ्या एका रात्रीतच हे मंदिर हटवण्यात आलं.
पुणे : पुण्यातील औंध येथे चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंदिर बांधण्यात आलं होतं. या मंदिराची आणि ते बांधणाऱ्या 'मोदीभक्ता'ची सर्वत्र तुफान चर्चा झाली. पण अवघ्या एका रात्रीतच हे मंदिर हटवण्यात आलं. पंतप्रधान कार्यालयाच्या आदेशावरूनच हे मंदिर हटवण्यात आल्याची चर्चा रंगली असतानाच आता मंदिराची निर्मिती करणाऱ्या खुद्द मयूर मुंडे यांनीच पुढे येत मंदिर हटवण्यामागचं कारण सांगितलं आहे.
औंध गावातील ॲड. मधुकर मुसळे यांच्या संकल्पनेतून मयूर मुंडे व आणि कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव म्हणून मोदी मंदिर उभारलं. परिसरातील ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते १५ ऑगस्टला मंदिराचे उद्घाटन करण्यात आलं. या मंदिर उभारणीचं वृत्त देशात चर्चिलं गेलं. यावर बरीच टीकादेखील झाली. त्यानंतर भाजप नेतृत्त्वानं त्याची दखल घेतली. आज सकाळी औंधमधील मंदिर झाकण्यात आलं. त्यातील मोदींचा पुतळादेखील मुसळे यांच्या कार्यालयात नेण्यात आला आहे.
मात्र आता भाजप समर्थक आणि मंदिराची निर्मिती करणाऱ्या मयूर मुंडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंदिराची निर्मिती करण्यापाठीमागची भावना खूप चांगली होती आणि आहे. मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी फोनद्वारे आपल्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिवंत व्यक्तीचे मंदिर बांधून पूजा करणे पक्षाचे तत्व आणि विचाराला अनुसरून नाही. त्याचप्रमाणे मोदींबद्दलचा आदर, भावना रस्त्यावर मंदिर बांधून जाहिरातरित्या व्यक्त न करता त्या मनातच ठेवण्यास सांगितले. त्यामुळे आता मंदिरातील मोदींची मूर्ती स्थानिक नगरसेविकेच्या कार्यालयात हलविण्यात आली आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षारंभाच्या मुहूर्तावर पुण्यात चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंदिराची उभारणी करण्यात आली होती. तसेच मोदींच्या कार्यावर आधारित काव्यरचना करून मोठ्या फलकावर झळकावण्यात आली आहे. परिसरातील ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते १५ ऑगस्टला मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. यंत्र काही नागरिकांनी मंदिर पाहण्यासाठी गर्दी केली होती. तर यावेळी काहीजण नमस्कार करताना दिसले होते. पण टीका झाल्यानंतर भाजपने याबाबत खुलासा करत मंदिर निर्मितीशी पक्षाचा काही संबंध नसल्याची स्पष्ट भूमिका जाहीर केली होती.