नरेंद्र मोदींची गॅरंटी जनतेसाठी नसून ती फक्त भाजपा आणि स्वत:साठीच- शशी थरूर
By राजू इनामदार | Published: May 6, 2024 08:05 PM2024-05-06T20:05:44+5:302024-05-06T20:11:32+5:30
इंडिया फ्रंटमधील सर्व नेते एकत्र बसून पंतप्रधानपदाचा निर्णय घेतील, आम्ही आतापासूनच त्यासाठी का बोलणी करू? असा प्रश्न थरूर यांनी केला...
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी गॅरंटी, गॅरंटी असे सांगत आहेत, मात्र त्यांची ही गॅरंटी जनतेच्या हितासाठी नाही, ती त्यांच्या स्वत:साठी व पक्षासाठी आहे अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी केली. इंडिया फ्रंटमधील सर्व नेते एकत्र बसून पंतप्रधानपदाचा निर्णय घेतील, आम्ही आतापासूनच त्यासाठी का बोलणी करू? असा प्रश्न थरूर यांनी केला.
महाविकास आघाडीचे पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ थरूर यांनी सोमवारी काँग्रेसभवनमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. उमेदवार धंगेकर, माजी मंत्री अनिल देशमुख, काँग्रेसचे माजी आमदार उल्हास पवार, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, युवक काँग्रेसचे केंद्रीय पदाधिकारी आशिष दुआ व अन्य स्थानिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी देशातील काही धनिक व्यक्तींसाठी म्हणून काम करत आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी त्यांच्याकडे काहीही नाही. मागील १० वर्षांत त्यांनी देशाच्या समस्या वाढवल्या आहेत अशी टीका करून थरूर म्हणाले, ‘देशात त्यांच्याविरोधात वातावरण तापत चालले आहे. याचे कारण सामान्य जनतेसाठी ते काहीही करायला नाही. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कुठेही मुस्लिम शब्दाचा साधा उल्लेखसुद्धा नाही. जाहीरनाम्यात नसलेल्या गोष्टी ते जनतेला सांगत आहेत. हा दिशाभूल करण्याचाच प्रकार आहे.
काँग्रेसचे राज्यातील विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी शहीद पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांना मारण्यात आलेली गोळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एका अधिकाऱ्याची होती असा आरोप केला. त्यावर बोलताना थरूर म्हणाले, हा आरोप गंभीर आहे. करकरे यांच्या कुटुंबाबरोबर चांगला परिचय होता. वड्डेटीवार असे बोलले असतील तर त्याची चौकशी व्हायला हवी.
इंडिया फ्रंटने पंतप्रधानपदासाठीचा उमेदवार जाहीर केलेला नाही याकडे लक्ष वेधले असता थरूर यांनी आम्ही असे कशासाठी करू असा प्रतिप्रश्न केला. लोकशाही वाचवण्यासाठी म्हणून आम्ही काही समान उद्देशांनी एकत्र आलो आहोत. निवडणूक लढवत आहोत. देशात आम्हाला चांगले वातावरण आहे. निवडून आल्यानंतर सर्व पक्षाचे नेते एकत्र बसतील, बैठक घेतील, त्यामध्ये पंतप्रधान कोण याची चर्चा होईल व एकमताने नाव ठरेल. तिवारी यांनी प्रास्ताविक केले.
केरळ राज्याचे तब्बल दीड लाख रहिवासी पुण्यात आलेत. त्यांचा मेळावा थरूर यांनी घेतला. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत आले. धंगेकर यांचा माझा शब्द या जाहीरनाम्याचे त्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. धंगेकर यांनी निरोगी, आनंदी, सुरक्षित पाण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले.