नरेंद्र मोदी पुणे दौरा : महापालिका शुक्रवारी संध्याकाळपासूनच होणार ‘सील’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 12:58 PM2022-03-04T12:58:05+5:302022-03-04T13:02:18+5:30
नरेंद्र मोदी यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैैनात...
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महापालिका भेटीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने कडक उपाययोजना करण्यात येत आहेत. शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजल्यापासून महापालिकेच्या आवारातील प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. यंत्रणा महापालिका इमारतीची बारकाईने पाहणी करुन सुरक्षा व्यवस्था सज्ज ठेवणार आहे. (narendra modi pune tour)
पंतप्रधान महापालिकेत येणार असल्याने सुरक्षा कडक करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांतर्फे देण्यात आले आहेत. महापालिका भवनाच्या आवारामध्ये आंदोलने, निदर्शने करता येणार नाहीत, साप्ताहिक सुटीच्या दिवशी मनपा भवनामध्ये गेटपासशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. सर्व नगरसेवक, स्वीकृत सदस्य, माजी नगरसेवक यांना स्वतंत्र ओळखपत्रे दिली जावीत, असे आदेशात म्हटले आहे.
महापालिकेचे सुरक्षा विभाग प्रमुख माधव जगताप म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैैनात करण्यात येणार आहे. पोलीस प्रशासन, केंद्रीय सुरक्षा यंत्रणा, महापालिकेची सुरक्षा यंत्रणा याबाबत समन्वयाने काम करत असून, शुक्रवारी, ४ मार्च रोजी संध्याकाळी ६.३० वाजल्यापासून कोणालाही महापालिका आवारात प्रवेश दिला जाणार नाही.
पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा व्यवस्थेनेही मागील तीन ते चार दिवसांपासून येथे तळ ठोकला आहे. गुरुवारी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही येथील कार्यक्रमांच्या सुरक्षा व्यवस्थेची स्वत: पाहणी करून आढावा घेतला. रविवारी कार्यक्रम असल्याने महापालिकेला सुटीच आहे. परंतु, सुरक्षा व्यवस्थेचे कारण देत कार्यक्रम स्थळी फक्त २५ जणांनाच प्रवेश देण्यात येईल, अशी भूमिका केंद्रीय सुरक्षा व्यवस्था आणि राज्य पोलिसांनी घेतली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्याच नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.
महापालिका भवनच्या आवारातील कार्यक्रमाला किमान २०० जणांना उपस्थित राहता यावे यासाठी पोलीस दल आणि केंद्रीय सुरक्षा दलाला विनंती करण्यात येत आहे. येत्या एक दोन दिवसात त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.