नरसिंहपूर रस्त्याचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:08 AM2021-01-10T04:08:36+5:302021-01-10T04:08:36+5:30
नीरा नरसिंहपूर : बावडा-नरसिंहपूर राज्य मार्गावरील जाधवफॉर्म ते नरसिंहपूर रस्त्याचे काम दोन वर्षानंतरही रखडलेले आहे. मातीमिश्रित मुरूमाच्या वापराने रस्त्याचे ...
नीरा नरसिंहपूर : बावडा-नरसिंहपूर राज्य मार्गावरील जाधवफॉर्म ते नरसिंहपूर रस्त्याचे काम दोन वर्षानंतरही रखडलेले आहे. मातीमिश्रित मुरूमाच्या वापराने रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. त्यामुळे रहदारीमुळे तयार झालेल्या धुळीमुळे शेतीपिके नागरिकांचा दम गुदमरू लागला आहे. पिंपरी ते टणू दरम्यान खडीमुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत असून, याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
बावडा-नरसिंहपूर राज्य मार्गाच्या कामाला ५७ कोटींचा निधी मंजूर आहे. त्यापैकी शिंदेवस्ती ते पिंपरी बुद्रुक रस्त्याचे २५ कोटींचे काम दोन वर्षापूर्वी पूर्ण झाले आहे. तर पिंपरी बुद्रक ते जाधव फॉर्म एका बाजूने खडी टाकण्याचे काम चालू होते तेही काम बंद आहे. पण, जाधव फॉर्म ते नरसिंहपूर रस्त्याचे काम दोन वषार्नंतरही ठेकेदाराच्या हेकेखोरपणाने रखडलेलेच आहे. अद्यापही काम संथगतीने पण निकृष्ट दर्जाच्या मुरूमाचा वापर करत संथगतीने सुरू आहे. रस्त्यावर पाणी मारले जात नसल्याने धुळीचा ग्रामस्थांना सामना करावा लागत आहे. रस्त्याचे काम चालू करेपर्यंत तरी ठेकेदाराने मुरूम टाकलेल्या ठिकाणी पाणी मारण्याची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी येथील परिसरातील शेतकरी करीत आहेत.
रस्त्यासाठी निकृष्ट दर्जाची माती मुरूमाचा भरावासाठी वापर करण्यात आलेला आहे. त्याची धूळ आजूबाजूला असलेल्या पिकांवर जात असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका सहन करावा लागत आहे. तर केलेल्या कामांचा दर्जाही निकृष्ट असून काम बंद पडलेले आहे. अनेक ठिकाणी तर खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करत जाण्याची वेळ आली आहे. बांधकाम अधिकारी वैद्य यांना बंद असलेल्या रस्त्याच्या कामासंदर्भात विचारले असता वरूनच सरकार निधीचे पैसे देत नाही म्हणून काम बंद आहे. शासनाचा निधी आल्याशिवाय आम्ही काम कसे चालू करू असा सवाल अधिकारी वर्ग करीत आहे.
नीरा नरसिंहपूर ते पिंपरी बुद्रुक दरम्यान खडीमुळे त्रास सहन करावा लागत आहे.
०९०१२०२१-बारामती-०१
---------------------