दंडावर टोचण्यापेक्षा नाकातून दिलेली कोरोना लस प्रभावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:14 AM2021-08-19T04:14:14+5:302021-08-19T04:14:14+5:30
ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधन : माकडांवर झाले प्रयोग प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : जिल्ह्यात आतापर्यंत लसीचा पहिला डोस घेतलेल्या ५४६६ जणांना, ...
ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधन : माकडांवर झाले प्रयोग
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : जिल्ह्यात आतापर्यंत लसीचा पहिला डोस घेतलेल्या ५४६६ जणांना, तर दुसरा डोस घेतलेल्या २१७० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. देशात पहिला डोस घेतलेल्या १ लाख ७१ हजार ५११ जणांना, तर दुसरा डोस घेतलेल्या ८७ हजार ४० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. लस नाकावाटे म्हणजेच ‘इंट्रा-नेझल स्प्रे’च्या स्वरूपात दिली तर नाकातील आणि घशातील विषाणूचे प्रमाण कमी करण्याचे काम प्रभावीपणे होत असल्याचे ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरियंटवर नाकावाटे दिली गेलेली लस जास्त परिणामकारक ठरेल, हे सिध्द झाले आहे.
याबाबत ऑक्सफर्ड विद्यापीठातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, “ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेका म्हणजेच भारतातील कोविशिल्ड या लसीचा नाकावाटे दिला जाणारा स्प्रे तयार करून त्याच्या चाचण्या सुरुवातीला प्राण्यांवर घेण्यात आल्या. नाकावाटे दिलेली लस ही स्नायूत दिलेल्या लसीपेक्षा अधिक सक्षमपणे संसर्ग रोखण्यास मदत करत असल्याचे दिसून आले आहे. नाकावाटे दिलेल्या लसीमुळे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम झालेले नाहीत. इंट्रा-नेझल स्प्रे लस नाक/घसा इथे वेगळ्या प्रकारच्या अँटीबॉडीज तयार करत असून, प्रभावी मेमरी बी आणि टी पेशींची निर्मिती करत आहेत. यामुळेच नाक, घास, संपूर्ण श्वसनमार्ग आणि फुप्फुस या ठिकाणचा विषाणूचा प्रभाव कमी होतो. ऑक्सफर्ड विद्यापीठात माकडांवर हा प्रयोग करण्यात आला. विद्यापीठामध्ये ५४ लोकांवर फेज-१ मधील क्लिनिकल ट्रायल्स सुरु झाल्या असून लवकरच फेज २ आणि फेज ३ क्लिनिकल ट्रायल्स सुरु होतील.”
भारतामध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचे दररोज नवीन रुग्ण सापडत आहेत. दोन्ही डोस घेऊनही अनेकांना कोविड संसर्ग होत आहे आणि काही लोकांचा मृत्यूही झाला आहे. दोन्ही व्हेरियंट नाकावाटे श्वसनमार्गाच्या वरच्या भागात म्हणजेच नाक आणि घशामध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग करत आहेत. सध्याची लस स्नायूत दिली जात असल्याने अँटीबॉडी श्वसनमार्गातील विषाणूवर हल्ला करु शकत नाहीत. त्यामुळेच लस दिलेल्या व्यक्तीपासूनही इतरांना संसर्ग होण्याची भीती आहे. सध्याच्या लसीमुळे रुग्ण रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. नाकावाटे देण्यात येणारी लसीमुळे संसर्गाचा दर कमी करणे शक्य होणार आहे.
चौकट
नव्या लसीची गरज नाही
“नाकावाटे दिलेल्या लसीमुळे फुप्फुसातील कोरोनाविरुद्धची प्रतिकारशक्ती ७० टक्क्यांनी वाढल्याचे आढळले. नाकावाटे दिलेल्या लसीमुळे रक्तातही अँटीबॉडीज तयार झाल्या. यासाठी नवी लस तयार करण्याची गरज नसून सध्या लसीकरणासाठी उपलब्ध असलेली लसच वापरली जाईल. भारत बायोटेक कंपनीनेही अशा प्रकारची लस विकसित करण्याचे काम सुरु केले असून मानवी चाचण्या सध्या सुरु आहेत. इतर कंपन्यांच्या लसी संशोधनात आहेत, पण त्या वेगाने वापरात आणण्याची गरज आहे. तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीत अशा प्रकारची लस उपलब्ध होईल आणि ती लस याआधी दोन डोस दिलेल्या लोकांना बुस्टर डोस म्हणून देता येईल.”
- डॉ. नानासाहेब थोरात, वरिष्ठ शास्त्रज्ञ, मेडिकल सायन्स डिव्हिजन, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, इंग्लंड