राष्ट्रीय पक्षी मोरांची पाण्यासाठी भटकंती, वन कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 05:44 PM2019-03-23T17:44:32+5:302019-03-23T17:48:50+5:30
तीव्र उन्हाळ्याच्या दिवसांत मुक्या प्राण्यांसाठी बनवलेल्या पाणवठ्यात वन विभागाला पाणी टाकण्याचा विसर पडला असून, कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने मोरांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाले असल्याचे चित्र दिसत आहे.
दावडी : खरपुडी (खुर्द) (ता. खेड) येथील वन विभाग क्षेत्रात मुक्या जिवांची पाण्यासाठी भटकंती सुरू असून, उन्हाळ्यामुळे वन विभागाने सुरू केलेले कृत्रिम पाणवठे तयार केले पण त्यात पाणी कुणी टाकायचे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रीय पक्षी मोर यांची पाण्यासाठी भटकंती सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे .
खरपुडी खुर्द येथे ६३ हेक्टर वनक्षेत्र आहे. हे क्षेत्र शिरोली वन विभागाच्या ताब्यात आहे. हा वन विभाग सदैव गजबजलेला असतो. या विभागात मोरांची संख्या वाढली आहे. सकाळ, संध्याकाळ येथे हे मोरांचे दर्शन घडत आहे. वन विभागाने कृत्रिम पद्धतीचे पाणवठे उभारले आहेत. या तीव्र उन्हाळ्याच्या दिवसांत मुक्या प्राण्यांसाठी बनवलेल्या पाणवठ्यात वन विभागाला पाणी टाकण्याचा विसर पडला असून, कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने मोरांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाले असल्याचे चित्र दिसत आहे. वन क्षेत्रातील अनेक प्राणी पाणवठ्याकडे पाणी पिण्यासाठी येतात मात्र तिथे पाणी नसल्यामुळे आल्या पावली परत जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे रानडुक्कर, मोर, लांडोर आदी प्राणी हा परिसर सोडून पाण्यासाठी भटकंती करीत आहे. काही मोरांचे कळप खरपुडी येथील शेतात फिरताना दिसत आहेत. परिणामी मोकाट कुत्र्यांचे या मोरांवर हल्ल्यांची घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वन विभागाने कृत्रिम पद्धतीचे मोरांसाठी पाणी पिण्यासाठी पाणवठे तयार केले. मात्र, यामध्ये पाणी कोणी टाकायचे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. वन विभागाचे याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. वन विभागाने मागील वर्षी खंडोबा मंदिराच्या पाठीमागे चार कृत्रिम पद्धतीचे पाणवठे तयार केले. त्यामध्ये हे पाणी टाकण्याची तसदी वन कर्मचारी घेत नसल्याचे दिसून येत आहे. खंडोबा मंदिरातील पुजारी राजेश गाडे हे रोज मोरांना सकाळ संध्याकाळ अन्नधान्य व कृत्रिम पाणवठे पाण्याने भरतात मात्र, खंडोबा देवाच्या मंदिराकडे रोज दिवसभर भाविक दर्शनासाठी येत असल्यामुळे मोर तिकडे फिरकत नाहीत. त्यामुळे मोरांना पाणी पिण्यास व अन्नधान्य खाण्यास मिळत नाही. तसेच वन विभागाने अर्धा किलोमीटर अंतरावर दोन कृत्रिम पाणवठे तयार केले मात्र त्यामध्ये पाणीच नसल्यामुळे वन्यजीव धोक्यात आला असल्याचे खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष काकासाहेब खाडे, राजेश गाडे व ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
......................................................
याबाबत शिरोलीअंतर्गत वन विभागाशी संपर्क केला असता, हे कृत्रिम पाणवठे ड्रम कापून तयार केले आहेत, त्याचाच अजून खर्च मिळाला नाही. मात्र वन विभागाच्या या क्षेत्रातील सर्व पाणवठ्यांत वाट्यात पाणी साठवण लवकरात लवकर करण्यात येणार असल्याचे वनपाल सीमा सपकाळ यांनी सांगितले.
...................