आयुषच्या धाडसाला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार; तलावात बुडणाऱ्या दोघांना वाचवून दिले ‘आयुष्य’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 02:35 PM2023-01-20T14:35:33+5:302023-01-20T16:42:12+5:30
तलावात बुडत असलेल्या मुलांना पाहून १३ वर्षीय आयुष तापकीर याने स्वत:च्या जिवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली
नारायण बडगुजर
पिंपरी : तलावात बुडत असलेल्या मुलांना पाहून १३ वर्षीय आयुष तापकीर याने स्वत:च्या जिवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली. तीन मुलांना पाण्याबाहेर काढले. त्यातील दोघांचा जीव वाचला. आयुषच्या या धाडसाने दोन मुलांना ‘आयुष्य’ दिले. त्याच्या या धाडसाचे कौतुक झाले. तसेच त्याला यंदाचा राष्ट्रीय स्तरावरील बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या लौकिकात भर पडली आहे.
आयुष तापकीर हा त्याच्या कुटुंबियांसह भोसरी येथील सद्गुरूनगर परिसरात वास्तव्यास आहेत. वडील गणेश, आई शीतल, मोठा भाऊ राेहीत, आजी ताराबाई व इतर असे त्यांचे एकत्र कुटुंब आहे. शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेती व्यवसाय असल्याने तापकीर कुटुंब गुरांच्या पालनाचा जोड व्यवसाय करतात. त्यात त्यांच्याकडे म्हशी, बैल, गायी आहेत. कोरोना काळात २०२१ मध्ये आयुष हा इयत्ता आठवीत शिकत होता. मात्र, शाळा बंद असल्याने मोबाइलवर ऑनलाईन क्लासला हजेरी लावत होता. २७ सप्टेंबर २०२१ रोजी ऑनलाईन क्लास झाल्यानंतर दुपारी आयुष हा म्हशींना तलावावर घेऊन गेला. त्यावेळी मुले पाण्यात बुडताना दिसली. जिवाची पर्वा न करता आयुषने तलावात उडी मारली. बुडणाऱ्या तीन मुलांना पाण्याबाहेर काढले. त्यातील एकाच्या पोटातील पाणीही पोट दाबून काढले. तीन मुलांपैकी दोघांचा जीव वाचवण्यात आयुष याला यश आले.
‘लोकमत’ने केली होती अपेक्षा व्यक्त
बाल्यावस्थेत असताना आयुष तापकीर याने दोन मुलांचा जीव वाचला. शौर्याचा अत्युच्च आदर्श त्याने निर्माण केला. अशा शौर्याचा गौरव म्हणून राष्ट्रीय स्तरावर बाल शौर्य पुरस्कार प्रदान केला जातो. राष्ट्रपतींच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाला हा पुरस्कार प्रदान केला जातो. या पुरस्कारासाठी आयुष याला सन्मानित करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त करणारे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी देखील त्याबाबतचे पत्र दिले होते.
दिल्लीत पुरस्कार वितरण
आयुष तापकीर याची ‘राष्ट्रीय शौर्य पुरस्कार २०२१’ यासाठी निवड झाल्याचे सरकारच्या भारतीय बाल कल्याण परिषदेतर्फे कळविण्यात आले. दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी पुरस्काराचे वितरण होणार आहे. या सन्मानामुळे भोसरी गाव तसेच परिसरातून आनंद व्यक्त होत आहे.