दहा वर्षांनंतर राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे फिरते खंडपीठ पुण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 09:53 PM2019-03-11T21:53:32+5:302019-03-11T21:56:02+5:30
दहा वर्षांनंतर हे फिरते खंडपीठ पुण्यात आले असून 11 ते 15 मार्च दरम्यान खंडपीठाचे कामकाज चालणार आहे.
पुणे : दहा वर्षांनंतर हे फिरते खंडपीठ पुण्यात आले असून 11 ते 15 मार्च दरम्यान खंडपीठाचे कामकाज चालणार आहे. राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या फिरत्या खंडपीठाचे कामकाज आझम कॅम्पसमधील लॉ कॉलेजमधील म्यूट कोर्ट येथे सोमवारी सुरु झाले.
सकाळी साडे दहा ते साडेपाच या वेळेत राष्ट्रीय खंडपीठाचे कामकाज चालणार आहे. खटल्यांची सुनावणी न्यायीक सदस्य दीपा शर्मा, सदस्य अनुप ठाकूर यांच्या समोर होणार आहे. ग्राहक संरक्षण कायद्यात स्पष्ट तरतूद असूनही केवळ जागे अभावी व प्रशासकीय अनिच्छे पोटी फिरत्या खंडपीठाच्या कामकाजात खंड पडला होता. तीन वषार्पूर्वीतर जागे अभावी खंडपीठाला सुनावण्याही घेता आल्या नाहीत. राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे खंडपीठ पुण्यात असावे यासाठी राष्ट्रीय आयोगाचे माजी अध्यक्ष डी. के. जैन यांच्याशी पत्र व्यवहार करून पाठपुरावा केला होता.
देशातील ग्राहकांना सोयीचे व्हावे म्हणून आयोगाचे खंडपीठ देशभर फिरते. पुण्यात दहा वर्षांनी येत असलेल्या या खंडपीठाचे पुण्यातील वकिलांनी स्वागत केले आहे. खंडपीठाचे कामकाज चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा आणि जागेची पाहणी करण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे पदाधिकारी काही दिवसांपूर्वी पुण्यात आले होते. त्यांनी पाहणी केल्यानंतर आझम कॅम्पसमधील लॉ कॉलेजमधील म्यूट कोर्टची जागा कामकाज चालविण्यासाठी निश्चित केली. 2008 मध्ये फिरते खंडपीठ पुण्यात आल्यानंतर साधारणत: महिनाभर कामकाज चालविण्यात आले होते. यापूर्वी 2008मध्ये हे खंडपीठ पुण्यात दाखल झाले होते. ग्राहक न्यायालयांकडे दाद मागणा-या ग्राहकांना एक कोटी रुपयांहून अधिक रकमेचा दावा किंवा राज्य ग्राहक आयोगाने दिलेल्या निकालाच्या विरुद्ध अपील करायचे असेल, तर नवी दिल्ली येथे राष्ट्रीय आयोगाकडे दाद मागावी लागते.