पुणे : दोन दिवस राष्ट्रध्वज उतरवलाच नाही, मुख्याध्यापकावर गुन्हा; तीन शिक्षकांचे निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 02:32 PM2022-05-05T14:32:30+5:302022-05-05T15:02:05+5:30
तीन शिक्षकांना निलंबित...
भोर (जि. पुणे) : महाराष्ट्र दिनानिमित्त शाळेमध्ये फडकविण्यात आलेला ध्वज त्याचदिवशी सायंकाळी न उतरवता दोन दिवस त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुख्याध्यापकांवर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर तीन शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. ही घटना भोर तालुक्यातील सावदरे जिल्हा परिषद शाळेमध्ये घडली.
संजय पापळे असे मुख्याध्यापकांचे नाव आहे. प्रवीण नांदे, शीतल टापरे, अहमद पटेल अशी निलंबित करण्यात आलेल्या शिक्षकांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सावरदरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाराष्ट्र दिनानिमित्त रविवारी (१ मे रोजी) सकाळी राष्ट्रध्वज फडकवला होता. नियमाप्रमाणे तो सायंकाळी ५ वाजता सन्मानपूर्वक उतरवायला हवा होता. मात्र, मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या बेफिकिरीमुळे त्यादिवशी राष्ट्रध्वज उतरवला नाही. दुसऱ्या दिवशीही रात्रं-दिवस ध्वज तसाच राहिला. पोलिसांनी ३ मे रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास ध्वज उतरवला आणि राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल केला.
महाराष्ट्र दिनी राष्ट्रध्वज फडकवून सावरदरे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय पापळ, शिक्षक प्रवीण नांदे, शीतल टापरे, अहमद पटेल यांनी पहिली ते सातवीचा वार्षिक निकाल वाटला आणि सायंकाळी पाच वाजता राष्ट्रध्वज उतरविण्यासाठी परत न येता बेफिकिरी दाखविल्याने राष्ट्रध्वज दोन दिवस तसाच फडकत राहिला. याची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी मंगळवारी (३ मे) दुपारी ३.३० वाजता सन्मानपूर्वक राष्ट्रध्वज उतरवला.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अहवाल
गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांनी संबंधित प्राथमिक शिक्षकांचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांना सादर केला. त्यानंतर गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी मुख्याध्यापकांसह तीन प्राथमिक शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली. याचा अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविला आहे. भोर पंचायत समितीकडून सरपंच व ग्रामसेवक यांनाही नोटीस काढण्यात आली आहे.