लोकनृत्यातून राष्ट्रीय एकात्मता
By admin | Published: January 5, 2015 11:17 PM2015-01-05T23:17:47+5:302015-01-05T23:17:47+5:30
बेळगाव येथे होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान फैयाज यांच्यासारख्या गुणी महिला कलावंताला मिळाला आहे.
पुणे : बेळगाव येथे होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान फैयाज यांच्यासारख्या गुणी महिला कलावंताला मिळाला आहे. यानिमित्ताने त्यांचा जीवनपट उलगडणारा रंगमंचीय अविष्कार आणि देशातील सर्व लोकनृत्यांच्या सादरीकरणातून राट्रीय एकात्मकतेचे दर्शन घडविणारा कलात्मक कार्यक्रम अशी दोन यंदाच्या नाट्य संमेलनाची प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. संमेलनाच्या इतिहासात एखाद्या संमेलनाध्यक्षाच्या कार्याची नोंद आगळ्यावेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून होेण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे.
नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद हा रंगकर्मींचा सन्मान असल्याने बिनविरोध पद्धतीने या पदावर रंगकर्मींची निवड केली जाते. यंदा उत्तम अभिनेत्री, गायिका अशी ओळख असलेल्या फैयाज यांची संमेलनाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. संमेलनाच्या व्यासपीठावरच संमेलनाध्यक्षपदाच्या कारकिर्दीचा आढावा घेण्याची आगळीवेगळी कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचे बेळगाव नाट्य परिषदेने ठरविले असून, त्यातूनच हा अभिनव प्रयोग आकाराला येत आहे.
नृत्य कलावंत आणि रंगकर्मी आसावरी भोकरे यांच्या संकल्पनेतून रंगमंचीय अविष्काराची निर्मिती केली जात आहे. फैयाज यांच्या लहानपणापासून ते नाट्य क्षेत्रापर्यंत झालेला प्रवास, काही वैयक्तिक आठवणींचा कप्पा कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे. संत गोरा कुंभार, गुंतता हदय हे, संगीत संशयकल्लोळ, कट्यार काळजात घुसली, संगीत मत्स्यगंधा, वीज म्हणाली धरतीला या सहा नाटकांमधील निवडक प्रवेश, त्यांच्या जीवनप्रवासाचे निवेदन, आठवणी व किस्से यांचा चित्रफितीमध्ये समावेश आहे. (प्रतिनिधी)
नाट्य संमेलनामध्ये माझा जीवनपट मांडण्यात येणार आहे,याविषयी मी देखील ऐकले आहे.भोकरे या नृत्यांगना आहे,पण माझी गाणी ही नृत्य्यावर आधारित नाहीत. त्यामुळे हा रंगमंचीय अविष्कार कशा स्वरूपात असेल याबाबत मलाही उत्सुकता आहे
- फैयाज