‘राष्ट्रवाद’ एका मर्यादेनंतर संकोचणारी गोष्ट : रंगनाथ पठारे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 06:25 PM2019-08-21T18:25:41+5:302019-08-21T18:26:10+5:30
आज आपण विनाशाच्या उंबरठ्यावर आहे...
पुणे : जग अशा टप्प्यावर आहे, जिथल्या सांस्कृतिक व सामाजिक परिस्थितीमागे राजकीय संदर्भ आहेत. जे आधी उदारमतवादी होते ते का बदलत गेले? याचा विचार करणे गरजेचे आहे.आज आपण विनाशाच्या उंबरठ्यावर असून, मानव प्रजाती म्हणून कोणत्या कठड्यावर उभे आहोत. याचं भान बाळगणं आवश्यक आहे.‘राष्ट्रवादा’ने आपल्यात भिंती निर्माण केल्या असून,‘राष्ट्रवाद’ ही एका मर्यादेनंतर आपल्या विचारांचा संकोच करणारीच गोष्ट ठरत आहे, अशा शब्दातं ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांनी ‘राष्ट्रवादा’वर परखडपणे भाष्य केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सांस्कृतिक कट्टा' उपक्रमांतर्गत त्यांनी संवाद साधला. यावेळी संघाचे सरचिटणीस चंद्रकांत हंचाटे, खजिनदार सुनील जगताप, उपाध्यक्ष सुकृत मोकाशी उपस्थित होते.
’राष्ट्रवाद’ ही संकल्पना जगभरात फोफावत आहे. याच राष्ट्रवादाने आपल्यात भिंती निर्माण केल्या आहेत, असे स्पष्ट करीत भिंती बांधून लोकांचे स्थलांतर थांबवता येणार नाही अशी मार्मिक टिप्पणी प्रा.पठारे यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अविचारी वक्त्यांवर केली. प्रत्येकाला जन्मापासून अस्तित्वाचे भय असते. एक असुरक्षितता जाणवत असते. हे असुरक्षिततेचे भय मरेपर्यंत कायम राहते. त्यावर मात करायची असेल तर समाजात बंधुतेची भावना अस्तिवात आणावी लागेल. मात्र हे काहीस अवघड असल्याचे ते म्हणाले.
’पत्रकारिता’ जबाबदारीने निर्भीडपणे लेखन करणारा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. सध्या सामान्य माणूस भीतीच्या सावटाखाली आहे. त्या स्थितीत त्यांना निर्भय बनविण्याचे मोठे काम माध्यमे करू शकतात.टीआरपी पलीकडे नैतिकता म्हणून काही गोष्ट आहे, सामान्यांना जाणून घेणं अधिक महत्वाचं आहे. मराठीला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा कधी मिळणार? याविषयी छेडले असता पठारे म्हणाले, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत आम्ही तयार केलेला मसुदा उत्तम असाच आहे. सहा वर्षे अभिजाततेचे घोंगडे भिजत पडले आहे. करायचं कुणी? दबाव टाकायचं कुणी? मराठी खासदार सांस्कृतीक मंत्र्यानी पुढे रेटायला हवं. पक्षांनी अजेंड्यावर विषय घेतला जायला हवा.आपल्या लोकानी दर्जा नसतानाही सांस्कृतिक पूर्वजांनी चांगले काम करून ठेवले आहे. इंग्रज नसते तर देशावर मराठ्यांनी राज्य केले असते.भाषावर प्रांतरचनेमुळे मराठीचे मोठे नुकसान झाले. देशभरात मराठीचा पसारा होता. अगदी पेशावरपासून तंजावरपर्यंत मराठी शाळा होत्या. मात्र, प्रांतरचनेमुळे विस्तार क्षीण झाला. मराठीपणाचा विस्तार जपायला हवा. बोली हे सांस्कृतिक सामर्थ्य आहे. त्यामुळे प्रमाणभाषा समृद्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
......
’बोन्साय’ व्हायचंय की ’वडाचं झाड’
वृत्तपत्रात लेखन प्रसिद्ध झाले की स्वत:ला ‘साहित्यिक’ समजण्यास सुरूवात होते. मात्र लेखनाला एकप्रकारचा संयम लागतो. साक्षरतेची संस्कृती तुम्हाला ’बोन्साय’ करायला टपली आहे. तुम्हाला ’बोन्साय’ व्हायचंय की ’वडाच झाड’ व्हायचंय हे ठरवायला हवे असे रंगनाथ पठारे यांनी ’लेखकां’ना सुनावले.