राष्ट्रवादीविरोधी ‘एल्गार’

By admin | Published: October 7, 2014 06:20 AM2014-10-07T06:20:58+5:302014-10-07T06:20:58+5:30

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे बारामती शहरात दि. ९ आॅक्टोबर रोजी होत आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच सभेचे आयोजन केले

Nationalist Anti-Corruption 'Elgar' | राष्ट्रवादीविरोधी ‘एल्गार’

राष्ट्रवादीविरोधी ‘एल्गार’

Next

बारामती : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे बारामती शहरात दि. ९ आॅक्टोबर रोजी होत आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच सभेचे आयोजन केले असल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्यादेखील भुवया उंचावल्या आहेत. राज्यातील इतर सभांमध्ये मोदींनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या नेत्यांनाच चांगलेच लक्ष्य केले आहे. आता थेट राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या बारामतीतच त्यांची सभा होणार असल्याने ते काय बोलणार, यावर राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षाचे बारामतीतील उमेदवार बाळासाहेब गावडे यांच्यासह दौंड, इंदापूर, पुरंदर, फलटण, माळशिरस या तालुक्यातील उमेदवारांसाठी या जाहीर सभेचे बारामतीत आयोजन केले आहे. त्यामुळे सभेला विशेष महत्व आहे. एकहाती सत्ता असून बारामतीसह अन्य तालुक्यातील पाण्याचा प्रश्न, रखडलेल्या उपसा सिंचन योजना, सहकारी साखर कारखान्यांसह अन्य संस्थांमधील गैरप्रकार आदी स्थानिक प्रश्नांबाबत नरेंद्र मोदी पवार यांना त्यांच्या बालेकिल्लयातच ‘लक्ष्य’ करणार काय, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
राज्याच्या राजकारणात भाजपाचे नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांनीच आतापर्यंत बारामतीत सभा घेऊन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार, अजित पवार यांना थेट आव्हान दिले होते. राज्य, राष्ट्रीय पातळीवरील अन्य पक्षातील नेत्यांशी शरद पवार यांचे सख्य असते, असे सांगितले जाते. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची बारामतीत सभा घेण्याचा प्रयत्न झाला होता. परंतू ते शक्य झाले नव्हते. बारामतीवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची एकहाती सत्ता आहे. परंतू मागील पाच वर्षात त्याला विविध आंदोलनाच्या माध्यमातून छेद देण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी कृती समिती व स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी उस दराच्या आंदोलनासाठी बारामतीची निवड केली. उग्र आंदोलन झाले. त्यामुळे वाढीव उस दराचा निर्णय सरकारला घ्यावा लागला. उस दराच्या आंदोलनाला स्थानिक नेते सतीश काकडे, रंजन तावरे, पृथ्वीराज जाचक यांचे नेतृत्व लाभले. त्यानंतर धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करावे, यासाठी धनगर आरक्षण कृती समितीच्या माध्यमातून भाजपाचे बारामतीचे विद्यमान उमेदवार बाळासाहेब गावडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. उपोषण, चक्री उपोषण, रास्ता रोको आदींच्या माध्यमातून आरक्षणासाठी आंदोलन झाले. राष्ट्रवादी कॉँग्रेसने २००९ च्या निवडणूकीत आरक्षणाचे मुद्दा जाहीरनाम्यात दिला होता, म्हणून बारामतीत आंदोलन झाले.
याच दरम्यान बारामती तालुक्यातील जिरायती भागातील जनतेने मागील वर्षी ऐन दिवाळीच्या सणाच्या काळात पाण्यासाठी आंदोलन सुरू केले. दोघा अंध व्यक्तींनी सुरू केलेल्या आंदोलनाला भाजपाचे नेते दिलीपराव खैरे यांनी पाठबळ दिले. त्यामुळे बारामतीची दुसरी बाजू उघड झाली. पाण्यासाठी मोर्चे, आंदोलने, काळ्या गुढ्या उभारून राष्ट्रवादीच्या नेत्यांचा निषेध करण्यात आला. त्यामुळे बारामतीत विरोध वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले. अलिकडच्या काळात बारामती आंदोलनाचे केंद्रच बनले होते.
याच पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूकीत सुप्रिया सुळे यांना बारामतीने तारले हे सत्य असले तरी, महायुतीच्या उमेदवाराने बारामतीच्या बालेकिल्लयात घेतलेली मते लक्षणीय ठरली आहेत. याच अनुषंगाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सभा सध्याच्या मोदी लाटेत महत्वाची ठरणार आहे. त्यातच बहुरंगी लढत असल्याने या सभेला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.

Web Title: Nationalist Anti-Corruption 'Elgar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.