शहराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत चुरस; २२ एप्रिलला निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 04:02 AM2018-04-19T04:02:01+5:302018-04-19T04:02:01+5:30
पक्षाचे नेते अजित पवार यांना शहराच्या मध्यभागात पक्षाला प्रवेश करून द्यायचा असून, त्यासाठी ते योग्य नावाच्या शोधात आहेत.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाची निवड येत्या २२ एप्रिलला होणार आहे. त्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत २९ एप्रिलला पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. खासदार वंदना चव्हाण यांनी शहराध्यक्षपदातून मुक्त करण्याची विनंती पक्षाला केल्यामुळे हे पद रिक्त होत असून, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये मोठीच चुरस आहे.
पक्षाचे नेते अजित पवार यांना शहराच्या मध्यभागात पक्षाला प्रवेश करून द्यायचा असून, त्यासाठी ते योग्य नावाच्या शोधात आहेत. माजी महापौर प्रशांत जगताप, माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्यापासून ते स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, दिलीप बराटे, बाबूराव चांदेरे आदी या पदासाठी इच्छुक आहेत. त्याशिवाय महिला नगरसेवकांनीही या पदासाठी काम करण्याची इच्छा दर्शवली आहे. त्यात माजी महापौर वैशाली बनकर यांचा समावेश आहे.
खुद्द अजित पवार यांनीही शहराध्यक्षपदासाठी काम करण्यास इतकेजण इच्छुक असल्याचे पाहून आश्चर्य व्यक्त केले असल्याची चर्चा आहे.
पक्षाच्या शहर शाखेने निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे; मात्र मध्यंतरी हल्लाबोल आंदोलनाच्या तयारीमध्ये सर्वच शहरांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या. खासदारपदाकडे लक्ष द्यायचे असल्यामुळे शहराध्यक्षपदाची जबाबदारी नको, असे पक्षाला कळवले होते. त्यामुळे आता २२ एप्रिलला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये शहर शाखेने पाठवलेल्या नावांबाबत चर्चा होऊन त्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब केले जाईल. २९ तारखेला पक्षाच्या बैठकीत तशी घोषणा केली जाईल.
- वंदना चव्हाण, खासदार