अॅमेनिटी स्पेस भाड्याने देण्यास विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी काँगेसचा ‘यू-टर्न’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:14 AM2021-08-26T04:14:35+5:302021-08-26T04:14:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सर्वसामान्य पुणेकरांच्या सोईसाठी असलेल्या अॅमेनिटी स्पेसवर (सुविधा केंद्र) महापालिकेतील सत्ताधारी भाजप डल्ला मारत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सर्वसामान्य पुणेकरांच्या सोईसाठी असलेल्या अॅमेनिटी स्पेसवर (सुविधा केंद्र) महापालिकेतील सत्ताधारी भाजप डल्ला मारत असल्याचा आरोप करून, वेळप्रसंगी न्यायालयात जाऊन अॅमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाला विरोध करू, असा पवित्रा घेणाऱ्या महापालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या भूमिकेत पूर्णत: ‘यू-टर्न’ घेतला आहे़ खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन आम्ही अॅमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाला सशर्त पाठिंबा देत असल्याचे बुधवारी जाहीर केले़ या वेळी पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडेही उपस्थित होते़
अॅड. चव्हाण यांनी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह पक्षाचे माजी महापौर, माजी स्थायी समिती अध्यक्ष व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच घेतली. यामध्ये सत्ताधारी भाजपने शहरातील एकूण अॅमेनिटी स्पेसपैकी ३३ टक्के अॅमेनिटी स्पेस या अर्बन फॉरेस्टकरिता राखीव ठेवाव्यात व ज्या जागेवर बांधकामे आहेत तेथे रुग्णालय, शाळा उभारून तो ग्रीन बेल्ट जाहीर करावा, असे मत मांडण्यात आले़ पक्षाच्या या मागण्या सभागृह नेते गणेश बिडकर यांनी मान्य केल्या असल्याने, उर्वरित अॅमेनिटी स्पेस खासगी विकसकांना निविदा पध्दती राबवून भाडेतत्त्वावर देण्यास आम्ही मान्यता देत असल्याचेही अॅड. चव्हाण यांनी सांगितले़
-------------------------------------
सत्ताधारी भाजप बहुमताच्या जोरावर अॅमेनिटी स्पेस भाड्याने देण्याचा प्रस्ताव मंजूर करणार हे निश्चित होते़ त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न व रिकाम्या जागांवर होणारी अतिक्रमणे रोखणे याची सांगड घालत, शहरातील पर्यावरण जपण्यासाठी आम्ही काही अटी ठेवल्या़ त्या भाजपने मान्य केल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे़
- अॅड. वंदना चव्हाण़
------------
अॅमेनिटी स्पेसबाबतचे घटनाक्रम
* प्रशासनाकडून अॅमेनिटी स्पेस विकण्याचा प्रस्ताव तयार.
* नागरिकांकडून विरोध झाल्यानंतर भाडेतत्त्वावर देण्याची दुरुस्ती.
* शहरातील सोसायट्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांची पालिकेच्या निर्णयाविरोधात याचिका.
* सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर अॅमेनिटी स्पेस देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर.
* महाविकास आघाडीचा विरोध.
* सभागृह नेत्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा.
* राष्ट्रवादी काँग्रेसची सशर्त पाठिंब्याची घोषणा.
----------------------------------