"NCP ला पुन्हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल" निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 01:01 PM2023-04-11T13:01:23+5:302023-04-11T13:03:12+5:30
राष्ट्रवादीकडून भाजपच्या बाजूने कोणतीही भुमिका घेतलेली नाही...
पुणे : काल राष्ट्रीय निवडणूक आयोगाने देशातील तीन पक्षांचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला. त्यामध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश आहे. या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, देशातील वेगवेगळ्या राज्यात निवडणूका झाल्या. त्यानंतर काही पक्षांबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. फक्त राष्ट्रवादीबाबत असा निर्णय घेण्यात आला आहे असे नाही. वेगवेगळ्या राज्यात मते घेण्यात काही कमतरता आली असेल, पण येणाऱ्या निवडणूकांमधे हा दर्जा पुन्हा मिळेल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
पाटील पुढे म्हणाले, कर्नाटक आणि इतर राज्यातील निवडणूकांमध्ये आम्ही राष्ट्रीय पक्ष हा दर्जा पुन्हा सहज मिळवू. हा पक्षासाठी सेटबॅक नाही. कारण राज्यात पक्षाचे घड्याळ हे चिन्ह कायम आहे. येत्या तीन- चार महिन्यांत हा दर्जा पुन्हा मिळेल. काही पक्षांची काही काळासाठी क्रेझ असते. आप या पक्षाने अनेक आश्वासनं दिली त्यानंतर त्यांचा पक्ष वाढला. आम्ही मात्र शक्य तेवढीच आश्वासने देतो. लोकांच्या पैशांवर आश्वासने देणे असे आम्ही करत आहोत नाही. आपने पंजाबमधे जी आश्वासने दिली ती पुर्ण होतायत का हे बघितलं पाहिजे, असंही पाटील म्हणाले.
अदानींच्या प्रकरणात चौकशीला विरोध नाही
राष्ट्रवादीकडून भाजपच्या बाजूने कोणतीही भुमिका घेतलेली नाही. भाजप स्वतः तशी समजत करुन घेत असेल.
अदानींच्या प्रकरणात चौकशीला विरोध नाही. फक्त जेपीसीच्या उपयोगाबद्दल शंका असल्यानेच पवार साहेबांनी ते वक्तव्य केलं. सावरकर हे महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून सावरकरांबाबत भुमिका घेण्यात आली आहे, असं पाटील म्हणाले.
प्रशांत जगताप पुणे लोकसभा लढणार?
प्रशांत जगताप हे चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांना लोकसभेची निवडणूक उमेदवारी मिळावी अशी आमच्या पक्षातील अनेकांची इच्छा आहे. अर्थात जर निवडणूक होणार असेल तर प्रशांत जगताप यांना उमेदवारी मिळावी अशी आमच्या पक्षाची मागणी आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत याबाबत आम्ही चर्चा करु. चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेबद्दल केलेल्या विधानावर विश्वास कसा ठेवायचा? कारण त्याला खूप वर्ष झाली आहेत.