जिल्ह्यात राष्ट्रवादीला धक्का
By admin | Published: October 20, 2014 02:12 AM2014-10-20T02:12:40+5:302014-10-20T02:12:40+5:30
तालुक्यातील नेत्यांनाच एकमेकांत झुंजवत ठेवून स्वत:चे महत्त्व अबाधित राखण्याची राष्ट्रवादी कॉँग्रेस च्या नेतृत्वाची खेळी पुणे जिल्ह्यातच त्यांच्यावर उलटली.
पुणे: तालुक्यातील नेत्यांनाच एकमेकांत झुंजवत ठेवून स्वत:चे महत्त्व अबाधित राखण्याची राष्ट्रवादी कॉँग्रेस च्या नेतृत्वाची खेळी पुणे जिल्ह्यातच त्यांच्यावर उलटली. बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीला जबर धक्का बसला. सहापैकी ३ आमदार पराभूत झाले.
इंदापूरमधील प्रतिष्ठेची जागा आपल्याकडे खेचून घेण्यात यश मिळाले असले तरी जुन्नर, खेड, शिरूर आणि दौंड या जागा राष्ट्रवादीला गमवाव्या लागल्या. अपेक्षेप्रमाणे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी विजय मिळविला असला तरी इतरत्र मात्र राष्ट्रवादीला जबर पराभव पत्करावा लागला.
खेडमध्ये गेल्या वेळी तिकीट देऊनही दिलीप मोहिते यांच्या दबावामुळे ऐनवेळी सुरेश गोरे यांना उमेदवारी नाकारली. मोहिते यांच्या विरोधात तालुक्यातील नेत्यांनीच परिवर्तन आघाडी उघडली होती. त्यातील गोरे शिवसेनेकडून आणि शरद बुट्टे-पाटील हे भाजपकडून लढून राष्ट्रवादीच्या पराभवाचे कारण ठरले. दौंडमध्ये कुल-थोरात या गटाला एकत्र करण्यात राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला अपयश आले. त्यामुळे कुल यांनी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करून विजय मिळवित राष्ट्रवादीला धक्का दिला. शिरूरमध्ये बाबूराव पाचर्णे यांना गेल्या वेळी पक्षात घेऊन ऐनवेळी तिकीट नाकारले. त्या नाराजीतून गेल्या वेळच्या पराभवाचा वचपा त्यांनी यंदा भाजपची उमेदवारी घेऊन काढला. जुन्नरमध्ये तर राष्ट्रवादीचे अतुल बेनके तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. येथे मनसेचे शरद सोनवणे विजयी झाले.
इंदापूरची जागा प्रतिष्ठेची करून राष्ट्रवादीने सर्व ताकद पणाला लावून हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. कॉँग्रेसला केवळ भोरमध्ये संग्राम थोपटे यांच्या रूपाने अस्तित्व टिकविता आली. पुरंदरमध्ये राष्ट्रवादीचे तब्बल २९ इच्छुक होते. त्यामुळे एकत्रित प्रचार झालाच नाही व अशोक टेकवडे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. कॉँग्रेसचे संजय जगताप यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. (प्रतिनिधी)