राष्ट्रीयीकृत बँकांचे कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:13 AM2021-03-16T04:13:21+5:302021-03-16T04:13:21+5:30
पुणे : राष्ट्रीयीकृत बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे सोमवारी राष्ट्रीयीकृत बँकांचे कामकाज ठप्प झाले. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ...
पुणे : राष्ट्रीयीकृत बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे सोमवारी राष्ट्रीयीकृत बँकांचे कामकाज ठप्प झाले. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निर्बंध लादण्यात आल्याने कर्मचाऱ्यांनी कमी संख्येने निदर्शन केली. मंगळवारीही हा संप सुरू राहणार आहे. बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात युनायटेड फोरम ऑरफ बँक युनियन्सने (यूएफबीयू) ही देशव्यापी संपाची हाक दिली आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉइज, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉइज फेडरेशन, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स आणि बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया या संघटना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या (यूएफबीयू) नेतृत्वात संपात सहभागी झाल्या.
देशभरातील एक लाखांपेक्षा अधिक बँक शाखांमध्ये काम करणारे १० लाख बँक कर्मचारी संपात सहभागी झाल्याचा दावा ‘यूएफबीयू’ने केला. मात्र, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक यांसारख्या खासगी बँकांसह सहकारी बँकांचे व्यवहार सोमवारी सुरळीत सुरू होते. क्लीअरिंग, तसेच रोखीच्या व्यवहारांना संपाचा फटका बसला. दुपारनंतर अनेक एटीएममधली रोकड संपली होती. या संपामुळे बँकांच्या शाखा स्तरावरील व्यवहार, चेक वटणे आणि सरकारी व्यवहार बंद पडल्याचा दावा ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनचे (एआयबीईए) सरचिटणीस सी.एच. वेंकटाचलम यांनी केला.
‘कोरोनाच्या निर्बंधांमुळे शाखा स्तरावर, तसेच चौकाचौकात मर्यादित उपस्थितीत निदर्शने करण्यात आली. मात्र, बँकांच्या खासगीकरणाला आमचा असलेला विरोध सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात आम्ही यशस्वी ठरलो. बँक कर्मचाऱ्यांचा संप पूर्णत: यशस्वी ठरला,’ असे ‘यूएफबीयू’चे पुण्याचे निमंत्रक विराज टिकेकर म्हणाले. खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण केल्यानंतर, आता पुन्हा त्यांचे खासगीकरण करण्याचा निर्णय हाणून पाडण्यासाठी हा संप पुकारण्यात आल्याचे ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशनचे मिलिंद कर्वे यांनी सांगितले.
‘सरकारी बँकांचे खासगीकरण केल्यास, तळागाळातील जनतेवर, शेतकऱ्यांवर, तसेच छोट्या व्यापाऱ्यांच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम होईल. त्यामुळे आम्ही हा संप पुकारून याचे गांभीर्य सर्वांपर्यंत पोहोचविले,’ असे स्टेट बँक स्टाफ युनियनचे सचिव राजेश मुळे म्हणाले.
५० हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग
‘राज्यात १० हजारांपेक्षा अधिक शाखांतून काम करणारे ५० हजारांवर बँक कर्मचारी आणि अधिकारी या संपात सहभागी झाले होते. यात सर्व सरकारी बँका, १२ जुन्या खासगी बँका, तसेच ५६ प्रादेशिक ग्रामीण बँकातील सफाई कर्मचारी ते शाखा अधिकारी असे सर्व कर्मचारी संपावर गेले. या बँकांचा व्यवसाय देशात १५० लाख कोटी रुपयांचा आहे, तर राज्यात अंदाजे ३० लाख कोटींचा आहे,’ असे ‘यूएफबीयू’चे राज्य निमंत्रक देविदास तुळजापूरकर म्हणाले.