नैसर्गिक अभिनय हीच डाॅ. श्रीराम लागूंच्या अभिनयाची खासियत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 01:56 PM2019-12-19T13:56:06+5:302019-12-19T13:57:48+5:30
डाॅ. श्रीराम लागूंच काम तरुण रंगकर्मींसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिलं आहे. त्यांच्या निधनांतर त्यांच्याप्रती तरुण रंगकर्मींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुणे : डाॅ. श्रीराम लागू आणि नाटक हे एकप्रकारे समीकरणच हाेते. त्यांच्या सहज, नैसर्गिक अभिनयाने त्यांनी नाटक खऱ्या अर्थाने जीवंत केलं. त्यांच्या नाटकांचे विषय देखील वेगळे असायचे. ते आपल्या नाटकांच्या बाजूने खंबीर उभे सुद्धा राहायचे. रंगभूमी गाजवलेल्या रंगमंचावरील 'नटसम्राटा'बद्दल तरुण रंगकर्मींच्या भावना 'लाेकमत'ने जाणून घेतल्या.
डाॅ. श्रीराम लागू यांना रंगमंचावर काम करताना पाहता आलं त्यामुळे आमची पिढी खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे. सूर्य पाहिलेला माणूस आणि त्यांच्या इतर नाटकांमधून त्यांना रंगमंचावर काम करताना पाहणं ही खरंच माेठी पर्वणी हाेती. असा माणूस या आधी झाला नाही आणि पुढे हाेणेही शक्य नाही. त्यांनी लिहीलेलं 'लमाण' हे पुस्तक आम्ही एक वस्तूपाठ म्हणून वाचताे. माझ्या काही नाटकांचे प्रयाेग त्यांनी पाहिले हाेते. त्यांनी माझं नाटक बघणे हीच माझ्यासाठी माेठी गाेष्ट हाेती.
- मुक्ता बर्वे
डाॅ. श्रीराम लागू आम्हा सर्वांसाठीच आदर्श हाेते. आमच्या संबंध पिढीवर त्यांच्या अभिनयाचा प्रभाव हाेता. त्यांचा अभिनय हा नैसर्गिक असायचा, खरा अभिनय ते करायचे. अभिनय करत असताना त्यामागे त्यांचा एक विचार असायचा, वैचारिक बैठक असायची. ते अभिनय करताना अनेक गाेष्टी ठरवून करायचे. परंतु त्या कधीच कृत्रिम वाटायच्या नाहीत. त्या नेहमीच नैसर्गिक वाटायच्या आणि हिच त्यांच्या अभिनयाची खरी खासियत हाेती. त्यांच्या अभिनयात अदभुत ताकद हाेती. त्यांचा हाच गुण घेण्याचा आम्ही सर्व कलाकारांनी प्रयत्न केला आहे.
- सुबाेध भावे
डाॅ. श्रीराम लागू हे अतिशय विवेकवादी व्यक्ती हाेते. ते एक विचार करणारे अभिनेते हाेते. त्यांनी नेहमीच नाटकातील भूमिकेच्या पलिकडची मते देखील मांडली. वाचिक अभिनयावर त्यांनी लेखन केलं. त्यांच्या नाटकांचे विषय खूप वेगळे हाेते. त्यांनी नेहमीच कलाकार म्हणून भूमिका घेतल्या. नाटकांच्या बाजूने उभे राहिले. कलाकरांच्या अभिनयामध्ये शिस्त आणण्याचंं काम सुद्धा त्यांनी केलं. ते नेहमीच चळवळीत राहून काम करायचे. त्यांनी डाॅ. नरेंद्र दाभाेळकरांबराेबर अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम देखील केले. त्यांनी त्यांच्या मुलाच्या स्मृतीप्रित्यर्थ तन्वीर सन्मान सुरु करुन प्रायाेगिक नाटकांना प्राेत्साहन देण्याचे काम केले.
- आलाेक राजवाडे
मी 17 वर्षांचा असताना डाॅ. श्रीराम लागूंसाेबत रंगमंचावर काम करण्याची संधी मिळाली. नटसम्राट हे नाटक निर्मात्यांना चित्रीत करुन जतन करुन ठेवायचे हाेते. लागू साेडले तर सर्व कलाकार त्यावेळी नाटकात नवे हाेते. त्यांच्यासाेबत त्यावेळी काम करण्याचा अनुभव अदभुत हाेता. तालमीच्या वेळी त्यांच्यासमाेर उभे राहताना दडपन यायचे. लागू नेहमी स्वतःबराेबरच समाेरच्याचा अभिनय कसा चांगला हाेईल याकडे कटाक्षाने लक्ष द्यायचे. सध्या अभिनय ही कला करप्ट हाेत चालली आहे. व्हिडीओ तयार करुन साेशल मीडीयावर टाकले तरी त्याला अभिनय समजण्यात येत आहे. गाण्यासारखा अभिनयामध्ये देखील रियाज महत्त्वाचा आहे असे लागूंचे मत हाेते. मला जेव्हा संधी मिळायची तेव्हा मी त्यांची भेट घेत असे. नैसर्गिक अभिनय हाच त्यांच्या अभिनयाचा मुळ गाभा हाेता.
- अमेय वाघ