शहरे स्मार्ट करताना निसर्गालाही जपायला हवे, एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 01:44 AM2018-04-16T01:44:15+5:302018-04-16T01:44:15+5:30

प्रत्येकाला आपल्या शहराविषयी प्रेम वाटते. मीही त्याला अपवाद नाही. पुणे हे खास शहर असल्याचे कुणी गमतीनं, तर कुणी गंभीरपणे म्हणतात. मला विचाराला तर हे शहर अनेक अर्थांनी आदर्श आहे.

 Nature needs to be protected even during the smart cities, Everestee Surendra Chavan | शहरे स्मार्ट करताना निसर्गालाही जपायला हवे, एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण

शहरे स्मार्ट करताना निसर्गालाही जपायला हवे, एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण

Next

प्रत्येकाला आपल्या शहराविषयी प्रेम वाटते. मीही त्याला अपवाद नाही. पुणे हे खास शहर असल्याचे कुणी गमतीनं, तर कुणी गंभीरपणे म्हणतात. मला विचाराला तर हे शहर अनेक अर्थांनी आदर्श आहे.
पुण्याचं सामाजिक वातावरण ऊर्जामय आहे. आधी इथल्या सामान्य माणसाच्या जगण्यात सहजपणा होता... वर्तनात आपुलकी अगदी सहज दिसायची. अर्थात आताही पुणेकरांमध्ये आपुलकी आहेच, मात्र ती शोधावी लागते. पुण्याच्या क्रीडा क्षेत्रातील विकासात येथील ‘क्लब कल्चर’चं योगदान खचितच मोलाचं आहे. एखाद्या क्लबच्या संघाने वा खेळाडूने काही चांगली कामगिरी केली की ती मागे टाकण्यासाठी इतर क्लबचे संघ वा खेळाडू इरेला पेटायचे. अर्थात, या स्पर्धात्मकतेला खिलाडूवृत्तीचं कोंदण असायचं. खेळाचा आनंद लुटून पुढे जाण्याची स्पर्धा रंगायची. आजही ही स्पर्धात्मकता दिसून येते. मात्र, त्यात खेळाचा आनंद लुटण्याचे प्रमाण काहीसे मागे पडल्याचे जाणवते. पुढे जाण्याची ऊर्मी, सकारात्मक ऊर्जा स्वत:पुरतीच मर्यादित न ठेवता वाटण्याची वृत्ती या दृष्टीने विचार करता आधीचं पुणं हे श्रीमंत होतं. ‘त्या’ काळात पुणे जगलो, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. माझ्यासारखे जे आधीचं पुणे जगलेत, त्यांना हे हरवणं जाणवणारं आहे. जे हरवलंय, त्याबद्दल वाईट वाटणं साहजिक आहे... बट इट्स अ मॅटर आॅफ टाईम.
महाराष्ट्राचा पहिला एव्हरेस्टवीर होणाचा मान मला मिळाला, यात शिस्तीचे योगदान निर्णायक आहे. ही शिस्त अंगी मुरण्यात जामनगरची सैनिकी शाळा, खेळ आणि पुण्याचं वातावरण कारणीभूत आहेत. गिर्यारोहण या क्षेत्रात ठरवून आलो नाही. जामनगरच्या सैनिकी शाळेत मी फुटबॉल खेळायचो. १९७७-७८च्या सुमारास पुण्यात टाटा मोटर्समध्ये नोकरी मिळाल्यावर लांब पल्ल्याच्या धावण्याच्या प्रकाराकडे मी आकर्षित झालो. त्या वेळी आम्ही फर्ग्युसन महाविद्यालयात सराव करायचो. धावण्याचा सराव करताना अपघातानेच मी गिर्यारोहणाकडे वळलो. सराव करताना पडल्यामुळे लिगामेंटची समस्या उद्भवली. त्यावरील शस्त्रक्रिया टाळण्यासाठी डॉ. शारंगपाणी यांनी काही व्यायाम सुचविले. व्यायामासोबतच लहान मुलांना मी खेळ शिकवायचो. एक दिवस तेथे येणाऱ्या युवकांनी ‘चला एक दिवस रॉक क्लार्इंबिंग शिकू या,’ असे सुचविले. ती या प्रकाराशी झालेली माझी पहिली ओळख. नंतर याची मला गोडी लागली. ‘एफसी’जवळील दगडी खाण आणि सहकारनगरमध्ये शिंदे हायस्कूलमागील दोन खाणींमध्ये मी सराव करायचो. तेथे आनंद पाळंदे यांची भेट झाली आणि मी ‘गिरिप्रेमी’च्या संपर्कात आलो. पहिल्याच भेटीत त्यांनी बंगळुरूला प्रशिक्षणास जाण्याची आॅफर दिली. तिथून आल्यावर मी गंभीरपणे सराव सुरू केला. सिंहगडावरील खांदकडा, ड्यूक्स नोज, बाण, आर्थर सीट, ढाकोबा, मंदा, पनवली द्वार, सतोपंत अशी ठिकाणं सर केल्यानंतर एव्हरेस्ट खुणावू लागले. अनेक संकंटांना तोंड देत १८ मे १९९८ या दिवशी मी एव्हरेस्ट सर केले. मी शिखरावर एकटा पोहचलो असलो तरी यामागे दीडशे जणांचे योगदान होते. थोडक्यात हे यश त्या दीडशे जणांचे होते. नोकरीच्या निमित्ताने मी पुण्यात यावे, ही नियतीची इच्छा असावी. दुसरीकडे गेलो असतो तर मी हे यश मिळवू शकलो नसतो.
शहरे स्मार्ट करताना निसर्गालाही जपायला हवे. किल्ले संवर्धन हा चांगला उपक्रम आहे. तो परिणामकारणकपणे अमलात यावा. भल्या पहाटे शुक्रवारी-शनिवारी सिंहगडावर जाणारे तरुण जत्थे म्हणजे पुणे हे निसर्गाची निगा राखण्याबाबत गंभीर असल्याचे आशादायी चित्र आहे. सामान्य पुणेकर हा विवेकी आहे. भविष्यातही त्याने सहिष्णुता जपावी.

शब्दांकन : अमोल मचाले
 

Web Title:  Nature needs to be protected even during the smart cities, Everestee Surendra Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.