प्रभागांना जत्रेचे स्वरूप
By admin | Published: February 18, 2017 03:56 AM2017-02-18T03:56:17+5:302017-02-18T03:56:17+5:30
प्रचारासाठी अवघे ७२ तास शिल्लक राहिल्याने आज सर्वच प्रभागांमधील उमेदवारांनी पदयात्रा, प्रचारफेऱ्या, कोपरासभा, हाऊस टू
पुणे : प्रचारासाठी अवघे ७२ तास शिल्लक राहिल्याने आज सर्वच प्रभागांमधील उमेदवारांनी पदयात्रा, प्रचारफेऱ्या, कोपरासभा, हाऊस टू हाऊस अशा विविध माध्यमांतून प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष प्रचार केला. उमेदवारांच्या कार्यालयांमध्ये तर लगिनघाईचे वातावरण होते. प्रचाराच्या उच्चांकामुळे मतदारसंघांना एखाद्या जत्रेचे स्वरूप आले होते.
१९ तारखेला प्रचार संपणार आहे. हातात अतिशय कमी अवधी असल्याने आज सकाळ उजेडताच उमेदवारांनी प्रचारासाठी केलेल्या नियोजनाप्रमाणे वसाहती गाठल्या. आपल्याला ज्या भागात कमी मते मिळतील, अशी शंका आहे, अशा भागात उमेदवार स्वत: प्रचारासाठी गेले. नातेवाईक, आप्तमित्र यांच्या प्रचाराची वेगळीच यंत्रणा कामाला लागली. पक्षाचे जुने कार्यकर्ते किंवा प्रचारक यांनीही प्रचार सुरू केल्याचे दिसून आले.
विविध पक्षीय उमेदवारांच्या प्रचाराची वाहने, त्यावरचे झेंडे, पत्रके वाटण्यासाठी निघालेल्या महिला, इकडून तिकडे वेगाने जाताना दिसणारी वाहने यामुळे काही प्रभागांमध्ये निवडणुकीला जत्रेचे स्वरूप आलेले दिसले.
उमेदवारांच्या कार्यालयांना तर आज लगिनघाईचे स्वरूप आले होते. स्वत: उमेदवार केवळ नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी धावपळ करतात. त्यांचे विश्वासू सहकारी किंवा आप्त प्रभागाच्या नकाशानुसार त्यांना दिशा ठरवून देत असतात. हाऊस टू हाऊस, पदयात्रा, प्रचारफेरी, धावती भेट, ज्येष्ठांच्या खास बैठका अशा विविध पद्धतीने उमेदवार नागरिकांशी संपर्क साधताना दिसत आहेत.
(प्रतिनिधी)