नाट्य परिषद निवडणूक बिनविरोध, १५ उमेदवारांचे अर्ज मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 06:10 AM2018-01-26T06:10:15+5:302018-01-26T06:10:29+5:30
नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमधून पुणे विभागातील २२ पैकी तब्बल १५ उमेदवारांनी गुरुवारी अर्ज मागे घेतल्याने सात जणांची परिषदेच्या नियामक मंडळावर थेट वर्णी लागली. बीड, उस्मानाबाद, नांदेड आणि नागपूरनंतर पुणे विभागाची निवडणूक बिनविरोध झाली. कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, प्रमुख कार्यवाह योगेश सोमण, पुणे शाखेचे प्रमुख कार्यवाह दीपक रेगे या दोन्ही शाखांच्या पदाधिका-यांसह चार जणांचा समावेश आहे.
पुणे : नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमधून पुणे विभागातील २२ पैकी तब्बल १५ उमेदवारांनी गुरुवारी अर्ज मागे घेतल्याने सात जणांची परिषदेच्या नियामक मंडळावर थेट वर्णी लागली. बीड, उस्मानाबाद, नांदेड आणि नागपूरनंतर पुणे विभागाची निवडणूक बिनविरोध झाली. कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, प्रमुख कार्यवाह योगेश सोमण, पुणे शाखेचे प्रमुख कार्यवाह दीपक रेगे या दोन्ही शाखांच्या पदाधिका-यांसह चार जणांचा समावेश आहे.
मागच्या निवडणुकीत अनेक गैरप्रकार झाल्यामुळे मध्यवर्ती नाट्य परिषदेकडून घटना दुरुस्ती करण्यात आली. पूर्वी पश्चिम महाराष्ट्राअंतर्गत सांगली, सातारा, कºहाड, इचलकरंजी आणि पुणे अशा विभागवार निवडणुका घेतल्या जायच्या. मात्र आता नवीन घटनेनुसार १९ जिल्ह्यांतील ज्या शाखांचे ३०० सभासद असतील त्यातला एक प्रतिनिधी परिषदेच्या नियामक मंडळावर घेतला जाणार आहे. पुणे विभागासाठी ७ जागा आहेत. त्यात पुणे, बारामती, तळेगाव, पिंपरी चिंचवड, कोथरूड आणि दौंड या ७ शाखांचा समावेश आहे. यंदा पुणे विभागातून २३ अर्ज सादर झाले होते. काही जणांनी आॅनलाईन अर्ज भरले होते. त्यातील सत्यजित धांडेकर यांचा अर्ज बाद झाला. गुरुवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यानुसार २२ पैकी १५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे सात जणांची नाट्य परिषदेच्या नियामक मंडळावर थेट वर्णी लागली. त्यामध्ये सुनील महाजन, योगेश सोमण, दीपक रेगे, भाऊसाहेब भोईर, राज काझी, दीपक काळे आणि सुरेश धोत्रे यांचा समावेश आहे. निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नास पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख यांनी अर्ज मागे घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला.
आमच्यावर विश्वास ठेवून ज्या इतर उमेदवारांनी निवडणूकीतून माघार घेत आम्हाला पाठिंबा दिला. त्यांचे आम्ही शतश: ॠणी आहोत. जे काम करण्याची इच्छा आम्ही व्यक्त केली आहे, ते काम पाच वर्षांत आम्ही करून दाखवू.
- योगेश सोमण, रंगकर्मी आणि दिग्दर्शक