नाट्य परिषद अजूनही आॅफलाइन, संमेलनाध्यक्षांची नावे नाहीत आॅनलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 03:10 AM2018-05-08T03:10:51+5:302018-05-08T04:02:41+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आजपर्यंतचे अध्यक्ष कोण ? हे जाणून घ्यायचे असेल तर गुगलवर अ.भा.साहित्य संमेलनाध्यक्षांची यादी असे टाकल्यास तारीख, वर्ष आणि नावांसह सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते.
- नम्रता फडणीस
पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आजपर्यंतचे अध्यक्ष कोण ? हे जाणून घ्यायचे असेल तर गुगलवर अ.भा.साहित्य संमेलनाध्यक्षांची यादी असे टाकल्यास तारीख, वर्ष आणि नावांसह सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते. मात्र अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांबाबतची माहिती विचारल्यास ‘माहिती उपलब्ध नाही’असे सांगितले जाते. संमेलनाध्यक्षांच्या डॉक्यूमेंटेशनबाबत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आजतागायत ‘आॅफलाईन’च राहिली असल्याचे समोर आले आहे. 98 व्या वर्षात पदार्पण करणा-या नाट्य
संमेलनाचे हे एकाअर्थी दुर्दैवच म्हणावे लागेल.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नाट्य संमेलनाध्यक्षांच्या डॉक्यूमेंटेशनकडे दुर्लक्ष झाले आहे. पु.ल देशपांडे. चित्तरंजन कोल्हटकर, जयमाला शिलेदार अशा नाट्यसृष्टीतील अनेक शिलेदारांनी संमेलनाध्यक्षपद भूषविले आहे. मात्र काही निवडक नावे सोडली तर आजवर भूषविलेल्या नाट्य संमेलनाध्यक्षांबाबत नवी पिढी अजूनही अनभिज्ञच आहे. त्यांचे डॉक्यूमेंटेशन करण्याबाबत नाट्य परिषदेला अजूनही ‘मुहूर्त’ लागलेला नाही.
मध्यवर्ती नाट्य परिषदेला शासनाकडून अनुदान दिले जाते. त्यातील काही निधीचा वापर हा डॉक्यूमेंटेशनसाठी करता येणे सहज शक्य आहे, अथवा सांस्कृतिक कार्यक्रमांवरही विशेष पैसा खर्च न करता ही गोष्ट करता येऊ शकते.
नाट्यप्रेमींनी पुढाकार घेण्याची गरज
नाट्य संमेलनाध्यक्षांचा परिचय देणारे पुस्तक नाशिकमधल्या एका नाट्य कलाकाराने काढले आहे. मात्र आजपर्यंत संमेलनाध्यक्षांच्या डॉक्यूमेंटेशनबाबत पुढाकार घेण्यात आलेला नाही. गुगलवर ही माहिती उपलब्ध नाही. मध्यवर्ती नाट्य परिषद, नाट्यप्रेमी मंडळींनी याबाबत पुढाकार घेण्याची गरज आहे.
- सुनील महाजन,
अध्यक्ष कोथरूड नाट्य परिषद
यापुढील काळात कशा पद्धतीने काम हळूहळू पुढे नेता येईल यासंबंधीचा विचार करण्यात येणार आहे. येत्या 13 मेला नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या पहिल्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यामध्ये नाट्य संमेलनाध्यक्षांच्या डॉक्यूमेंटेशनचा मुददा नक्कीच मांडला जाईल आणि भविष्यात ते काम नक्कीच पूर्णत्वास येईल.
- दीपक रेगे, सदस्य नियामक मंडळ, अ.भा.मराठी नाट्य परिषद