नाट्यसंमेलन ‘ताप’दायक

By admin | Published: March 27, 2017 03:16 AM2017-03-27T03:16:12+5:302017-03-27T03:16:12+5:30

मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून महाराष्ट्र तापायला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत ऐनउन्हाळ्याच्या ‘ताप’दायक

Natya Sammelan 'fever' | नाट्यसंमेलन ‘ताप’दायक

नाट्यसंमेलन ‘ताप’दायक

Next

पुणे : मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून महाराष्ट्र तापायला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत ऐनउन्हाळ्याच्या ‘ताप’दायक वातावरणात उस्मानाबाद येथे ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कलाकार मंडळींना संमेलनाला जाण्यापूर्वीच चांगला ‘घाम’ फुटला आहे. संयोजकांनी उन्हाच्या बचावासाठी ‘एक ते चार बंद’ असा मध्यंतराचा पर्याय शोधून काढला असला तरी नाट्यसृष्टीतील दिग्गज कलावंत मंडळी संमेलनाकडे फिरकण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे हे संमेलन सर्वसमावेशक न ठरता त्यावर ‘स्थानिक’ संमेलन अशा शिक्का बसण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दरवर्षी नाट्यसंमेलन घेण्यात येते. यंदाच्या निवडणुकांमुळे हे संमेलन पुढे ढकलावे लागले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तुलनेने कमी त्रास होईल, या कारणाने सुरुवातीला पहिल्या आठवड्यातच संमेलन घेतले जाणार होते. त्यानुसार ७ ते ९ एप्रिल अशा संमेलनाच्या तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र दहावीसह शालेय परीक्षांच्या काळामुळे संमेलनाच्या तारखा पुन्हा पुढे ढकलाव्या लागल्या आणि संमेलन दि. २१ ते २३ एप्रिलदरम्यान घेण्यावर शिक्कामोर्तब झाले. उन्हाळी हंगामातच संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याने नाट्यकलावंतांसह बाहेरगावहून संमेलनाला हजेरी लावणाऱ्या रसिकांना संमेलनापूर्वीच चांगला घाम फुटला आहे. उस्मानाबाद येथे तापमानाचा पारा हा ४० अंशांच्यावर असतो. याचा विचार करून संयोजकांनी उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी दुपारी १ ते ४ बंद पुकारून संमेलन सकाळी ८ ते दुपारी १ आणि दुपारी ४ ते रात्री १२ असे घेण्यात येईल, असे जाहीर केले. मात्र, सकाळी बाहेर पडणाऱ्या कलावंतांनी या बंदच्या वेळेत करायचे काय? बाहेरगावाहून येणारे नाट्यरसिक दुपारच्या वेळेत संमेलनस्थळ सोडून कुठे जाणार, त्यांच्यासाठी संयोजकांकडून काही व्यवस्था करण्यात आली आहे का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. अंगाची लाही लाही करणाऱ्या उकाड्यात हॉटेलच्या रूम किंवा जिथे सोय केली आहे तिथे जाणे शक्य नाही आणि बाहेर उन्हात फिरताही येणार नाही, अशा स्थितीला सर्वांना सामोरे जावे लागणार आहे. यातच हिवाळा असो वा उन्हाळा कधीही संमेलन घेतले तरी त्याकडे पाठ फिरवणाऱ्या नाट्यसृष्टीतील कलाकारांना यंदा ‘आयते कोलीत’ हातात मिळाले आहे. कायम ‘एअर कंडिशन’मध्ये राहणारे कलाकार ४५ अंश तापमान असलेल्या भागात किती तग धरू शकतील, हापण प्रश्न
आहेच. ‘शो मस्ट गो आॅन’प्रमाणे नाट्यसंमेलनाच्या परंपरेला खंड पाडायचा नाही, म्हणून केवळ यंदाचे संमेलन घेतले जात असल्याचे बोलले जात आहे. नियामक मंडळाचे सदस्य आणि नाट्य परिषदेचे पदाधिकारीच संमेलनात पूर्णवेळ उपस्थित राहतील की नाही, याबाबतही शंका आहे. नाट्य परिषदेच्या एका सदस्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले, की यंदाच्या संमेलनाला तापमानामुळे अत्यल्प प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. नाट्यसृष्टीतील दिग्गज कलाकार सोडाच, पण उस्मानाबादमधील नागरिकही संमेलनात कितपत फिरकतील, अशी शंका आहे.
(प्रतिनिधी)

रंगणार नाट्यमहोत्सव
४नाट्यसंमेलनापूर्वी १५ ते १९ एप्रिलदरम्यान उस्मानाबाद येथे नाट्यमहोत्सव रंगणार आहे. त्यामध्ये ‘मोरूची मावशी,’ ‘कट्यार काळजात घुसली,’ ‘तो मी नव्हेच’ अशा गाजलेल्या नाटकांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. संमेलनाचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांच्या ‘तुझं आहे तुजपाशी’ या नाटकाने होणार आहे.
उन्हाचा वाढता पारा लक्षात घेता संमेलनात दुपारी एक ते चारदरम्यान कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत. त्याऐवजी रात्री बारा वाजेपर्यंत कार्यक्रम चालतील. तशी परवानगी घेण्यात आली आहे. कलाकारांची उपस्थिती वाढावी, यासाठी प्रयत्न सुरू असून सर्वांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहा.
-दीपक करंजीकर, प्रमुख कार्यवाह,
मध्यवर्ती नाट्य परिषद

Web Title: Natya Sammelan 'fever'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.