नाट्य संमेलन बेळगावमध्येच होणार
By Admin | Published: December 21, 2014 12:02 AM2014-12-21T00:02:54+5:302014-12-21T00:02:54+5:30
सीमाप्रश्नासंदर्भात केलेल्या विधानामुळे अडचणीत आलेल्या नाट्य संमेलनावरील आयोजनाचे मळभ लवकरच दूर होण्याचे संकेत मिळाले आहेत.
पुणे : नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी सीमाप्रश्नासंदर्भात केलेल्या विधानामुळे अडचणीत आलेल्या नाट्य संमेलनावरील आयोजनाचे मळभ लवकरच दूर होण्याचे संकेत मिळाले आहेत. नियामक मंडळाच्या कार्यकारिणीने एकमताने ‘बेळगाव’लाच संमेलन करण्याचा जोर कायम ठेवला असल्यामुळे संमेलन सीमाभागातच होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
दुधाने तोंड पोळल्यामुळे ताकही फुंकून पिण्याची वेळ आलेल्या पदाधिकाऱ्यांनी यापुढे कोणत्याही संमेलन बेळगावलाच व्हावे, अशी सगळ्यांची इच्छा आहे. मात्र, याबाबतची भूमिका दोन दिवसांत जाहीर करू, असे मुंबई नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी सांगितले. आम्हाला सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तालमी सुरू ठेवण्यास सांगितले आहे, मात्र अद्याप ठोस काहीही सांगण्यात आलेले नाही, असे बेळगाव नाट्य परिषदेच्या अध्यक्षा वीणा लोकूर यांनी सांगितले. या प्रकारे वादाला तोंड फुटू नये यासाठी सल्लामसलत करूनच योग्य ती पावले उचलण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
कर्नाटक सीमाप्रश्नावर संमेलनात ठराव करण्याची प्रथा ही वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. मात्र, यंदाच्या बेळगाव संमेलनाच्या व्यासपीठावर सीमाप्रश्नावर ठराव केला जाणार नाही, अशी भूमिका जोशी यांनी जाहीर केल्याने त्याचे पडसाद बेळगावमध्ये मोठ्या प्रमाणावर उमटले.
महाराष्ट्र एकीकरण समितीनेही बेळगाव नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांवर दबाव टाकून संमेलन घेण्यास असमर्थता दर्शविण्यास भाग पाडल्यामुळे बेळगावच्या संमेलनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती.
(प्रतिनिधी)
४गेल्या आठवड्यात नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत दोन्ही बाजूंवर साधकबाधक चर्चा झाली. त्यामध्ये सर्वांचा ओढा हा बेळगावमध्येच संमेलन व्हावे, असा होता. मात्र, घाईघाईने याच्या निर्णयाप्रत येणे शक्य न झाल्याने बेळगावला संमेलन घ्यायचे का नाही? हा निर्णय स्थगित ठेवण्यात आला. संपूर्ण विचाराअंती याबाबत चार ते पाच दिवसांत संमेलनाबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यानुसार बेळगावलाच संमेलन घेण्याचे निश्चित झाले असल्याचे सूत्रांकडून कळाले असून, याबाबत दोन दिवसांत भूमिका जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.