‘एचए’ कंपनीला नवसंजीवनी
By admin | Published: December 22, 2016 02:15 AM2016-12-22T02:15:07+5:302016-12-22T02:15:07+5:30
येथील हिंदुस्थान अॅन्टिबायोटिक्स (एचए) कंपनीला पुनरुज्जीवनाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कंपनीच्या मालकीची
पिंपरी : येथील हिंदुस्थान अॅन्टिबायोटिक्स (एचए) कंपनीला पुनरुज्जीवनाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कंपनीच्या मालकीची शहरात मोक्याच्या ठिकाणची ८७ एकर जागा विक्री करून त्यातून कपंनीचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. कंपनीची आर्थिक देणी देण्याबरोबर कामगारांचे दोन वर्षांचे थकीत वेतन दिले जाणार आहे. कंपनीला नवसंजीवनी मिळावी, याकरिता १०० कोटींचा निधी कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिला जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड परिसरातील एचए कंपनी १९९७ ला आजारी उद्योग म्हणून जाहीर केली. आर्थिक संकटात सापडल्याने कंपनी डबघाईला आली. उत्पादन प्रक्रियेवर विपरीत परिणाम झाला. २००६ मध्ये कंपनीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले. केंद्रीय रसायनमंत्री रामविलास पासवान यांच्या काळात केंद्र शासनाने १३२ कोटींचे पुनर्वसन पॅकेज मंजूर केले होते.
त्यानंतर कंपनीची स्थिती काही अंशी सुधारली होती. त्या वेळी कंपनीची जागा विक्री करून निधी उभारण्याचा पर्याय पुढे आला होता. मात्र, कंपनीची जागा विक्री करण्यास कामगारांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे कंपनीची जागाविक्रीचे प्रस्ताव बारगळले. कालांतराने पुन्हा कंपनी अडचणीत आली. कर्जाचा डोंगर वाढत गेला असून, कामगारांचे २४ महिन्यांचे वेतन थकले आहे.
आघाडी सरकारच्या कालखंडात एचए मजदूर संघाचे अध्यक्ष, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी तसेच भाजपा शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे यांनीही केंद्रीय रसायनमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडे कंपनी वाचविण्यासाठी मागणी केली होती. पुन्हा एकदा कंपनीला पुनर्वसन पॅकेज देण्याच्या मागणीचा रेटा वाढला होता. तसेच वेतन वेळेवर मिळत नसल्याने आणि पुनवर्सन होत नसल्याने कामगारांनी आंदोलनही केले होते.
एचए कंपनीला पुनरुज्जीवन मिळण्यासंदर्भात निर्णय झाला. यासंदर्भात खासदार साबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन तर
बारणे यांनी प्रसिद्धीपत्रक काढून माहिती दिली. एचए कंपनीला पुनरुज्जीवन मिळण्याचा निर्णय झाल्याने कामगारांना थकीत वेतन मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)