Navatri special : 'त्यांच्या' चेहऱ्यावर हसू आले की आम्हालाही आपोआपच समाधान वाटते
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 09:02 PM2018-10-09T21:02:35+5:302018-10-09T21:15:15+5:30
नवरात्र निमित्त विविध क्षेत्रातील महिलांशी संवाद साधून त्यांच्या कार्याला सलाम करण्यात येत अाहे. समाजात रूग्ण आणि दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या महिलांशी ‘लोकमत ती चा कट्टा’ वर संवाद साधण्यात आला.
पुणे : नवरात्र म्हणजे देवीचा नऊ रात्रीचा जागर. या नवरात्र उत्सवात देवीची चेहऱ्यावर विविध रूप आणि नवरसाचे दर्शन भाविकांना घडते, त्याच रूपातल प्रेमळ, संवेदनशील आणि सेवाभावी वृत्तीने समाजासाठी काम करणारे ‘ती’ चे एक अभिनव रूप. कुटुंबाची दोरी हातात सक्षमपणे सांभाळत सामाजिक बांधिलकीच्या नात्याने समाजात झोकून देऊन ‘ती’ काम करीत आहे....ना पैशाची ना कुणाच्या
कौतुकाची अपेक्षा...अत्यंत निरपेक्ष मनाने ‘ती’ समाजाप्रती असलेले उतरदायित्व पार पाडत आहे. अशाच समाजात रूग्ण आणि दिव्यांग मुलांसाठी काम करणा-या महिलांशी ‘लोकमत ती चा कट्टा’ वर संवाद साधण्यात आला. 'त्यांच्या’ चेह-यावर हसू आले की आम्हालाही आपोआपच समाधान आणि आनंद वाटतो...समाजानेही थोडी सेवाभावी वृत्ती जोपासण्याची गरज असल्याची भावना
सामाजिक क्षेत्रात काम करणा-या महिला आणि परिचारिकांकडून व्यक्त करण्यात आली.
विशेष मुलाच्या अाई असलेल्या सरिता बसरुर म्हणाल्या, ज्यावेळी गर्भवती होते, तेव्हा डॉक्टरांकडे रेग्युलर चेकअप करायला जायचे.
पण कधी शंका आली नाही किंवा डॉक्टरांनी देखील सांगितले नाही की तुमचे मूल हे विशेष मुल असणार आहे. तोपर्यंत अशी काही मुलं असतात याची देखील आम्हाला फारशी माहिती नव्हती. मुलगी सात महिन्यांची झाल्यानंतर डोळ्यात विशिष्ट हालचाल जाणवायची. सर्दी, ताप झाल्यावर आम्ही तिला दुस-या डॉक्टरकडे नेले. त्यांनी मुलीला डाऊन सिंड्रोम आहे असे सांगितल्यावर आम्हाला शॉकच बसला. जेनेटिक प्रॉब्लेममुळे हे होऊ शकते. मुलीची प्रगती संथ होईल असे मनात गृहीत धरले होते. तरीही तिला नॉर्मल शाळेत पाठविले.
मात्र शाळेने मुलगी विशेष आहे तिला इथे विनाकारण त्रास होईल तेव्हा विशेष शाळेमध्येच टाका असा सल्ला शाळेने दिला. आपल्याला असे मूल झाले याचा थोडासा त्रास झाला मात्र तिच्यावरच लक्ष्य केंद्रित केले आणि तिने देखील आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिला
कुटुंबामध्ये दिव्यांग मुले आहेत मात्र त्याची फारशी वाच्यता केली जायची नाही. अनेक पालक मुलांना घरातच डांबून ठेवायचे. या मुलांबाबत समाजात विशेष जनजागृती नव्हती. मात्र हळूहळू सामाजिक जाणीवा अधिक प्रगल्भ होत गेल्या. या मुलांशी कसे वागायचे याचे अभ्यासक्रम निर्मिती झाले. प्रशिक्षण दिले जाऊ लागले. त्यामुळे सेवावृत्तीमधून काम करणारे तयार झाले. या मुलांसह साठ वर्षापर्यंतच्या व्यक्तींसाठी काम करताना संयम ही गोष्ट शिकले. स्वत:च्या मुलांकडून अनेकदा अपेक्षा ठेवल्या जायच्या. पण आता स्वत:च्या मुलांबददलची भावनिकता अधिक वाढली आहे असे सावली संस्थेच्या समाजसेविका अलका पारखी, यांना वाटते.
तर शिक्षिका असणाऱ्या काजल खंदारे म्हणाल्या, मी डीएड करताना वेगळ काम करायचे म्हणून या मुलांच्या प्रश्नांकडे वळले. या अशा मुलांसह व्यक्तींचे भावविश्व जाणून घेणे आवश्यक असते. अनेकदा मुले किंवा व्यक्ती हायपर होतात. त्यांच्या मनासारखे झाले नाहीतर ते चिडचिड आणि आदळआपट करायला सुरूवात करतात. अशा वेळी त्यांना शांत करण्यासाठी त्यांना काय आवडते हे आम्हाला माहिती असावे लागते. कारण या मुलांना मारून उपयोग नसतो. त्यांना मायेच्या स्पर्शाची गरज असते. त्यांचे निरीक्षण करून मार्ग काढणे. या मुलांशी इतके भावनिक बंध निर्माण झाले आहेत की ते सुटटीसाठी घरी गेले की आम्हाला करमतच नाही. त्यांच्याकडून आम्हाला निर्विवाद प्रेम मिळते. त्यांना शिकविताना आम्हालाही शिकवावे लागते.