नवाब मलिक यांनी विनाकारण खोटं बोलू नये, आमदार चंद्रकांत पाटील यांचा टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 08:06 PM2021-04-18T20:06:10+5:302021-04-18T20:06:50+5:30
राज्य सरकारला परिस्थिती हाताळता येत नसल्याचे चित्र
पुणे: भारतातील सोळा रेमडीसीवीर कंपनीच्या निर्यातदारांपैकी सात कंपन्यांनीच हे इंजेक्शन विकावे. असे केंद्र सरकारने जाहीर केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. त्यांनी इंजेक्शन विकण्याला सोळा कंपन्यांची परवानगी नसल्याचे पत्र दाखवावे. असा पलटवार करत विनाकारण खोटं बोलून त्यामध्ये राजकारण आणू नये असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मलिक यांना बजावला आहे.
पुण्यातील कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे हॉस्टेलमध्ये उभारलेल्या कोव्हीड केअर सेंटरच्या पाहणीसाठी ते आले होते. यावेळी ते बोलत होते. राज्यात कोरोनाची भीषण परिस्थिती होत चालली आहे. राज्य सरकारला परिस्थिती हाताळता येत नसल्याने ते सतत केंद्राकडे बोट दाखवत आहेत. केंद्राकडून महाराष्ट्रात जास्त लसी आल्या आहेत. त्यांच्या काळाबाजार झाला तर काही वाया गेल्या असतील. तरी कमी दिल्याचा आरोप केला जात आहे. आम्ही पण राजकारणात माहीर आहोत. असेही त्यांनी राज्य सरकारला सुनावले आहे.
रेमडीसीवीरबाबत बोलताना ते म्हणाले, केंद्राने हे इंजेक्शन न देण्याच पत्र जाहीर केलं. ते गुजरात एफडीएने दिलेले आहे. त्याबाबतही सरकार उघडे पडलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर याचा आढावा घेत आहेत. रेमडीसीवीरबाबत सरकार आधी पैसे देऊ शकत नाही. आम्ही पाऊल उचलले तर आमच्यावर आरोप झाले.
मोदी फोनवर उपलब्ध होत नाहीत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदींना दोनदा फोन केले आहेत. ते उपलब्ध होत नाहीत असे उद्धव ठाकरे सांगतात. हे साफ खोटं आहे.
सर्वसामान्य माणूस मंत्र्यांना घरात बसू देणार नाही.
लोकांमध्ये भीतीबरोबरच चिडचिडे वातावरण निर्माण झाले आहे. ते बेड आणि उपचारासाठी वणवण फिरू लागले आहेत. आम्ही सरकारला मदत करण्यास तयार आहोत. पण तेच पुढे यायला तयार नाहीत. नगरसेवक आणि आमदारांच्या निधीतून काम करून घेण्याची विनंती अजित पवार यांना केली आहे. त्यामधून मी स्वतः एक कोटी देण्याचे जाहीर करतोय. पुण्यात येत्या आठवड्यात दोन हजार ऑक्सिजन बेड उपलब्ध करणार आहोत. तर नगरसेवकांच्या निधीतून दोन ऑक्सिजन प्लांट उभे करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.