नक्षलवाद्यांच्या ‘फ्रंट आॅर्गनायझेशन’ वाढल्या
By admin | Published: April 14, 2016 02:25 AM2016-04-14T02:25:28+5:302016-04-14T02:25:28+5:30
पुण्यामध्ये नक्षलवाद्यांच्या ‘फ्रंट अॅक्टीव्हिटी’ वाढल्या असून, अशा फ्रंट आॅर्गनायझेशनवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. शहरात लष्कर आणि वायुदलाची महत्त्वाची केंद्रे आहेत. त्यामुळे दहशतवादाविरुद्ध
पुणे : पुण्यामध्ये नक्षलवाद्यांच्या ‘फ्रंट अॅक्टीव्हिटी’ वाढल्या असून, अशा फ्रंट आॅर्गनायझेशनवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. शहरात लष्कर आणि वायुदलाची महत्त्वाची केंद्रे आहेत. त्यामुळे दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी अभ्यासपूर्ण उपाय योजना राबविणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली होती. आपण यापूर्वी राज्याच्या गुप्तचर विभागात काम केलेले असल्यामुळे पुण्याच्या समस्या माहिती असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी या अनुभवाचा उपयोग करून घेणार असून, पुण्याचा भौगोलिक अभ्यास करून संवेदनशील ठिकाणांवर लक्ष केंद्रित केले जाईल. यासोबतच मिळालेल्या गुप्त माहितीचे विश्लेषण करून दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील. पुण्यात सर्वधर्मीय नागरिक राहण्यास आहेत. त्यामुळे सांप्रदायिक तणावाची स्थितीही अनेकदा निर्माण होत असल्याने शांतता प्रस्थापित करण्यासाठी विशेष लक्ष घालणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘सोशल मीडिया’द्वारे असंतोष माजविण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे सायबर लॅबच्या माध्यमातून त्यावर ‘वॉच’ ठेवण्यात येत आहे. सीसीटीव्ही फुटेजचा वापर अधिकाधिक करून गुन्हे उघडकीस आणले जातील.
स्मार्ट पोलिसिंग करणार : स्मार्ट सिटीसाठी कडक आणि संवेदनशील, आधुनिक आणि जलद, विश्वासार्ह आणि प्रतिसाद देणारी, तंत्रज्ञानात पारंगत अशी स्मार्ट पोलिसिंग करणार आहे. निलंबित पोलिसांना म्हणणे मांडण्याची संधी देणार आहे. २९ एप्रिल रोजी महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधून चर्चा करणार. त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यावर भर देणार असल्याचे शुक्ला यांनी सांगितले.
पोलीस आणि नागरिकांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे. आपण नागरिकांसाठी २४ तास उपलब्ध आहोत. आयुक्तालयामध्ये दररोज ३ ते ५.३0 पर्यंत नागरिक मला भेटू शकतात. मी पोलिसांना दर शुक्रवारी भेटणार. पोलीस वसाहतींना स्वत: भेट देऊन तेथील स्थिती तपासणार. पोलीस ठाण्यांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधणार आहे.
शहरातील जमिनींचे भाव वाढत चालल्यामुळे लँडमाफिया आणि संघटित गुन्हेगारी वाढत चालली आहे. संघटित गुन्हेगारीचे कंबरडे मोडणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. स्ट्रीट क्राइम नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणार. महिला सुरक्षा महत्त्वाचा विषय आहे. ‘व्हीजिबल पोलिसिंग’ राबविणार असून, सर्व उपायुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत.
नागरिकांना आवाहन
नि:संकोचपणे आपली तक्रार नोंदवा. तक्रारीची प्रत विनामूल्य आणि त्वरित मिळणे हा तुमचा अधिकार. तुमच्याच शब्दांत तक्रार नोंदवली गेली पाहिजे. तक्रारीची तत्काळ दखल घेऊन ती वेळेत नोंदवली जाईल, याची खातरजमा करा. गैरवर्तणुकीचा अनुभव आल्यास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करा. त्यांनीही दखल न घेतल्यास सहायक आयुक्त, उपायुक्त, सह पोलीस आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडे थेट तक्रार करा. दर शनिवारी सकाळी दहा ते साडेअकरा या वेळेत तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले जाणार आहे.
पोलीस आयुक्त : ७७१९८८१००७
सह आयुक्त : ९८२३०५५१७७