नयनतारा सेहगल यांचं अप्रकाशित भाषण पाेहचलं विद्यार्थ्यांपर्यंत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 03:56 PM2019-01-08T15:56:20+5:302019-01-08T16:11:22+5:30
साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून आमंत्रित करण्यात आलेल्या नयनतारा सेहगल यांचे निमंत्रण मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे त्या जे भाषण उद्घाटनाच्या दिवशी करणार हाेत्या ते भाषण आता चर्चेचा विषय झाले आहे.
पुणे : साहित्य अकादमी पुरास्कार प्राप्त इंग्रजी लेखिका नयनतारा सेहगल यांना 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून बाेलवण्यात आले हाेते, परंतु त्यांच्या सराकारवर टीका करणाऱ्या भाषणामुळे त्यांना पाठवलेलं निमंत्रण मागे घेण्यात आल्याचे बाेलले जात आहे. सरकारने आयाेजकांवर दबाव टाकून त्यांना पाठवलेले निमंत्रण मागे घ्यायला लावले अशी टीकाही सर्वच क्षेत्रातून केली जात आहे. नयनतारा सेहगल या संमेलनाच्या उद्घाटक म्हणून येणार नसल्या तरी त्या जे भाषण करणार हाेत्या ते सध्या चांगलेच गाजत आहे. त्यांचे हेच भाषण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध संघटनांच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील विविध ठिकाणी जात तेथील विद्यार्थ्यांना वाटले. त्यामुळे ज्या भाषणासाठी सेहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यात आले तेच भाषण आता चर्चेचा विषय झाले आहे.
यवतमाळ येथे 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हाेणार आहे. यंदा पहिल्यांदाच निवडणुकीशिवाय अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली. डाॅ. अरुणा ढेरे यांची निवड अध्यक्ष म्हणून करण्यात आली. या संमेलनाच्या उद्घाटक म्हणून नयनतारा सेहगल यांना निमंत्रित करण्यात आले हाेते. परंतु संमेलन सुरु हाेण्याच्या काहीच दिवस आधी सुरक्षेचे कारण पुढे करत त्यांना पाठविण्यात आलेले निमंत्रण मागे घेण्यात आले. सेहगल यांच्या अप्रकाशित भाषणात त्यांनी सराकरवर जाेरदार टीका केली हाेती. देशात चाललेली झुंडशाही ही सरकार पुरस्कृत आहे असे परखड मत त्यांनी त्यांच्या भाषणात मांडले हाेते. त्यांचे निमंत्रण मागे घेतले असले तरी त्यांचे भाषण सर्वच वर्तमानपत्र आणि व्हाॅट्सअपच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पाेहचले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध पुराेगामी संघटनांच्या विद्यार्थ्यांनी साेमवारी सेहगल यांच्या भाषणाच्या 300 प्रती विद्यापीठात वाटल्या. विद्यापीठातील अनिकेत कॅन्टींन, जयकर ग्रंथालय, ललित कला केंद्र, विद्यार्थी वसतीगृह या ठिकाणी या प्रतिंचे वाटप करण्यात आले. या प्रती वाटणारा आकाश दाैंडे म्हणाला, नयनतारा सेहगल यांच्या भाषणामुळे त्यांचे निमंत्रण नाकारणे म्हणजे हा एक प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील घाला आहे. सराकराने त्यांचे भाषण दाबण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचे उलटेच झाले. लाेक आता सेहगल यांचे साहित्य माेठ्याप्रमाणावर वाचू लागले आहेत. विद्यार्थ्यांनाही त्यांच्या साहित्याबाबत उत्सुकता दिसून येत आहे. राजकरण्यांच्या दबावाला साहित्यिकांनी बळी पडणे याेग्य नाही. त्यामुळे आम्ही त्यांचे भाषण विद्यार्थ्यांपर्यंत पाेहचविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या भाषणाच्या 300 प्रती आम्ही विद्यापीठात वाटल्या. विद्यार्थी आणि नागरिकांनीही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला.