'एनबीटी’चे कार्यालय मुंबईहून पुण्यात आणणार; चंद्रकांत पाटलांचे आश्वासन
By श्रीकिशन काळे | Published: November 28, 2024 04:32 PM2024-11-28T16:32:51+5:302024-11-28T16:33:19+5:30
केवळ पुणे पुस्तक महोत्सवा पुरते ‘एनबीटी’चे काम येथे होणार नसून, वर्षभर विविध उपक्रम होतील
पुणे : नॅशनल बुक ट्रस्टचे विभागीय कार्यालय आता मुंबई येथून कायमस्वरूपी पुण्यात होणार असून, त्यांना मनपाकडून एका इमारतीची जागा तत्काळ भाड्याने दिली आहे. त्यामुळे आता केवळ पुणे पुस्तक महोत्सवा पुरते ‘एनबीटी’चे काम येथे होणार नसून, वर्षभर विविध उपक्रम होतील. त्यासाठी मुंबईचे कार्यालया पुण्यात आणणार आहोत, असे आश्वासन माजी मंत्री व आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने यावर्षीच्या पुस्तक महोत्सवाचे आयोजन १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होत आहे. पुस्तक महोत्सवाचे कार्यालयाचे उद्घाटन आणि मांडवाचे भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते गुरवारी करण्यात आले. यावेळी महोत्सवाचे आयोजक राजेश पांडे, खासदार प्रा.मेधा कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरू सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू पराग काळकर, ‘एनबीटी’चे संचालक युवराज मलिक, अध्यक्ष मिलिंद मराठे, उद्योजक कृष्णकुमार गोयल, डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, डीईएस अध्यक्ष प्रमोद रावत, उपाध्यक्ष अशोक पलांडे, जेष्ठ संपादक किरण ठाकूर, भाजप नेते माधव भंडारी, फर्ग्युसन महाविद्यालय प्राचार्य डॉ. विजय तडके आदी उपस्थित होते.
राजेश पांडे म्हणाले की, हा महोत्सव पुणेकरांचा आहे. यावर्षी चार विश्व विक्रम यात होतील. ते विक्रम चीनच्या नावावर आहेत. महोत्सवाला साडेसात लाख लोक भेट देतील, अशी अपेक्षा आहे. मागील वेळी साडेअकरा कोटींची पुस्तक विकली गेली. यंदा ती दुप्पट होतील. ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते १ यादरम्यान शांतता पुणेकर पुस्तक वाचत आहे उपक्रम राबवला जाणार आहे.’’
‘एनबीटी’चे दिल्लीत मुख्य कार्यालय आहे. तिथे विविध उपक्रम देखील होतात. तसेच देशात काही ठिकाणी उपकेंद्रे असून, त्यात महाराष्ट्राचा समावेश आहे. मुंबईत एक उपकेंद्र आहे. ते उपकेंद्र पुण्यात आणण्यासाठी प्रस्ताव दिला असून, त्याला मंजुरी मिळाली आहे. आता अंतिम पत्र हातात पडल्यानंतर पुढील कार्यवाही करता येणार आहे.- मिलिंद मराठे, अध्यक्ष, नॅशनल बूक ट्रस्ट
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे, त्यामुळे याबाबतची माहिती सर्वसामान्य लोकांना समजण्यासाठी एक फिल्म तयार करून महोत्सवात दाखवण्यात यावी. मुलांसाठी चित्रपट महोत्सव आहे, त्या सोबत एका पुस्तकावर आधारित नाटक बसवावे. त्यातून मुलांमध्ये पुस्तकाची आवड निर्माण होईल. - चंद्रकांत पाटील, माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री