NCB चा पंच किरण गोसावीला 8 दिवसांची पोलिस कोठडी; नाव बदलून फिरला अनेक राज्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 07:29 PM2021-10-28T19:29:34+5:302021-10-28T19:38:14+5:30
फरार असतानाच्या काळात किरण गोसावी हा लखनौ, फत्तेपूर, कानपूर, हैदराबाद, सोलापूर, सातारा, विजापूर, अमळनेर, चाळीसगाव, मुंबई, पनवेल, लोणावळा या ठिकाणी फिरल्याचे पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले
पुणे : अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात ‘एनसीबी’कडून साक्षीदार करण्यात आलेला फरार किरण प्रकाश गोसावी (वय ३७, रा. वाशी, नवी मुंबई) याला पकडण्यात पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाला यश आले आहे. परदेशात नोकरीच्या आमिषाने पुण्यातील तरुणाला फसवणुकीच्या ३ वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात तो फरार होता. याप्रकरणी पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी त्याला लुकआऊट नोटीस बजावली होती.
मुंबईतील क्रुझ पार्टीत अटकेतील आर्यन खान बरोबरचा फोटो व्हायरल झाल्यानंतर तो चर्चेत आला होता. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने त्याला कात्रजमधील मांगडेवाडीतील लॉजमधून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला गुरुवारी अटक करण्यात आले, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलीस आयुक्त डॉ. रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे उपस्थित होते.
परदेशात नोकरीच्या आमिषाने तरुणाला ३ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी किरण गोसावी याच्याविरुद्ध पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी यापूर्वी त्याची मैत्रिण शेरबानो मोहम्मद इरफान कुरेशी (वय २७, रा. गोवंडी, मुंबई) हिला अटक केली आहे. गोसावीचा शोध घेण्यासाठी तीन पथके मागावर होती. बुधवारी (दि.२७) पहाटे साडेतीनच्या सुमारास किरण गोसावी कात्रज परिसरात असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून मांगडेवाडीतील लॉजमध्ये छापा टाकून त्याला अटक केली.
त्याला आज सायंकाळी न्यायालयात हजर करण्यात आले. गोसावी याच्याविरुद्ध कापुरबावडी, अंधेरी, कळवा या पोलीस ठाण्यात एकूण ४ गुन्हे दाखल आहेत. त्याला ४ एप्रिल २०१९ रोजी फरार घोषित केले होते. किरण गोसावी हा सध्या वापरत असलेला मोबाइल सचिन सिद्धेश्वर सोनटक्के याना नावाने घेतला असून बनावट कागदपत्राचा वापर करून तो घेतल्याचा संशय आहे. चिन्मय देशमुख यांचे पैसे ज्या बँक खात्यात स्वीकारले. त्याचा शेरबानो कुरेशी हिने कधीही वापर केला नसून गोसावी याने बनावट अकाऊंट तयार करून फसवणुकीचे रक्कम स्वीकारण्यासाठी वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे बनावट कागदपत्राचा वापर करणे व बँक खाते सुरू करण्याच्या फार्मवर बनावट सही करणे या गुन्ह्यांसाठी ४६५, ४६८ अन्वये कलम वाढ करण्यात आली आहे. फरार असलेल्याच्या काळात तो कोठे फिरला याचा तपास करायचा असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.
बनावट नावाने अनेक राज्यात फिरला-
फरार असतानाच्या काळात किरण गोसावी हा लखनौ, फत्तेपूर, कानपूर, हैदराबाद, सोलापूर, सातारा, विजापूर, अमळनेर, चाळीसगाव, मुंबई, पनवेल, लोणावळा या ठिकाणी फिरल्याचे पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले. पुणे पोलीस अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर होते. त्याचे लोकेशन आढळलेल्या ठिकाणी पोलिसांचे पथक जात होते. मात्र, तो गुंगारा देत होता. तेथे तो सचिन पाटील या बनावट नावाने व बनावट ओळखपत्र तयार करून रहात असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे.