देशसेवा आणि शौर्य गाजविण्याची संधी देते ‘एनसीसी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:08 AM2021-07-15T04:08:37+5:302021-07-15T04:08:37+5:30
-- असे वाढले एनसीसीचे महत्त्व भारतामध्ये एनसीसीची सुरुवात १९४८ मध्ये पहिल्यांदा झाली, त्या वेळी ती खूप मर्यादित स्वरुपात होती, ...
--
असे वाढले एनसीसीचे महत्त्व
भारतामध्ये एनसीसीची सुरुवात १९४८ मध्ये पहिल्यांदा झाली, त्या वेळी ती खूप मर्यादित स्वरुपात होती, त्याचवेळी मुलींसाठी स्वतंत्र डिव्हिजन सुरु झाले. १९६२ मध्ये भारत-चीन युध्दामध्ये भारताला पराभव पत्कारावा लागला तेव्हा एनसीसीअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले. त्यापाठोपाठ १९६५ मध्ये झालेल्या भारत-पाक युध्दामध्ये भारताने पाकला पाणी पाजले तेव्हा एनसीसी कॅडेट्सने सैन्याच्याबरोबर सेकंड लाइन ऑफ डिफेन्सच्या भूमिकेतून मोठी मदत केली. त्यानंतर १९७१ मध्ये सुध्दा पाकिस्तान- बांगलादेश विभाजनावरून झालेल्या लढाईत एनसीसीचे कर्तृत्व महत्त्वाचे ठरले होते. त्यानंतर एनसीसीच्या प्रशिक्षणावर विशेष लक्ष दिले गेले.
--
प्रवेश आणि परीक्षा शालेय जीवनात आठवीत असताना एनसीसीमध्ये प्रवेश घेता येतो. दर आठवड्याला दोन दिवस असे दोन वर्षभर प्रशिक्षण असते, ७० टक्के उपस्थिती आणि एक वार्षिक शिबिर (एटीसी) पूर्ण केल्यावर ए प्रमाणपत्राची परीक्षा देता येते. त्यानंतर महाविद्यालयीन जीवनात अकरावीत असताना किंवा वरिष्ठ महाविद्यालयातील पहिल्या वर्षात असताना प्रवेश घेता येतो. शालेय अभ्यासक्रमाप्रमाणे महाविद्यालयीन एनसीसी प्रशिक्षण आठवड्यातून दोन दिवस चालतात, मात्र महाविद्यालयाचा अभ्यासक्रम तीन वर्षे चालतो. दुसऱ्या वर्षी ‘बी’ प्रमाणपत्राची परीक्षा असते, तर तिसऱ्या वर्षी ‘सी’ प्रमाणपत्र परीक्षा होते. सी प्रमाणपत्र परीक्षेसाठी दोन वार्षिक शिबिर (एटीसी) आणि एक इतर शिबिर उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. शाळा महाविद्यालयांत एनसीसी कोर्स असेल तर शाळेमार्फत प्रवेश होतो, अन्यथा एनसीसी ग्रुप ऑफिसमध्ये स्वतंत्रपणे थेट प्रवेश घेता येऊ शकतो.
---
काय शिकायला मिळेल
विद्यार्थिदशेत असताना सामान्यपणे कोणत्याच विद्यार्थ्यांना रायफल शूटिंग करण्यास मिळत नाही. खासगी क्लास, कोचिंग, क्लबच्या माध्यमातून शूटिंग शिकण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात. मात्र मात्र एनसीसीमध्ये रायफल चालविण्याची संधी प्रत्येक ती संधी प्रत्येक विद्यार्थ्यांना देते, रायफल चालविण्याचे प्रशिक्षण तुम्हाला देते त्यात चमकदार कामगिरी केली, तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतही तुम्हाला सहभागी घेण्याची संधी मिळते. याबरोबरच आर्मी ॲटॅचमेंट या दहा दिवसांच्या शिबिरात रणगाडे चालविण्याचे प्रशिक्षण मिळते, त्याच्या प्रात्यक्षिकाची संधी केवळ एनसीसीत मिळू शकते, पॅरा ग्लायडिंग या स्वतंत्र कॅम्पमध्ये पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण मिळते. याशिवाय परेड (संचलन), मॅप रीडिंग (युध्दाच्यावेळीचा वापर), यु्ध्दात ॲटॅक करण्याच्या योजना (प्लाटून ॲटॅक) कशा राबविल्या जातात, त्याचे प्रात्यक्षिक, रायफल, ऑटोमॅटिक गनसारख्या शस्त्रास्त्र खोलणे, जोडणे यासह दैनंदिन जीवनात शिस्तीत आणि टापटीप राहणे, व्यायाम आदी गोष्टींचे प्रशिक्षण एनसीसीत विद्यार्थ्यांना मोफत मिळते.
--
राजपथावर संचलनात सहभाग
२६ जानेवारी रोजी लाल किल्ला येथील राजपथावर लष्कराचे संचालन, विविध मंत्रालय, राज्यांचे प्रतिनिधी यांचे रथयात्रा आपल्यातील अनेकांनी टीव्हीवर पाहिल्या आहेत. त्या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी एनसीसीच्या माध्यमातून मिळते. राजपथावरील संचालन, पीएम रॅली व प्रजासत्ताक दिनानिमित होणारे कार्यक्रम व स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी देणारा महाविद्यालयीन जीवनातील एकमेव अभ्यासक्रम म्हणजे एनसीसी.
--
सारे कामही मोफतवरून भत्ताही
--
एनसीसीप्रमाणे शालेय जीवनात आरएसपी, स्काऊट, गाईड तसेच महाविद्यालयीन जीवनात एनएसएससारखे आदी कोर्स आहेतच. मात्र, त्या कोर्समध्ये प्रवेश घेतल्यावर त्याच्या गणवेशापासून ते बुटापर्यंत साऱ्या गोष्टींचा खर्च विद्यार्थ्यांना करावा लागतो. एनसीसीमध्ये मात्र विद्यार्थ्यांना दोन गणवेशापासून, बूट त्याला प्रशिक्षणासाठी देण्यात येणारी रायफल, त्याचे बुलेट्स आदी साऱ्या गोष्टींचा खर्च एनसीसीच्या वतीने होतो. शिवाय वर्षाच्या शेवटी त्या गणवेशाच्या धुलाई भत्ता व इतर भत्ताही देण्याची तरतूद एनसीसीमध्ये असल्याने विद्यार्थ्यांना एनसीसी प्रशिक्षण घेताना एक रुपयाचाही खर्च येत नाही.
---
खासगी कंपन्यात संधी
एनसीसी प्रशिक्षण पूर्ण केल्यावर सीडीएस किंवा स्टाफ सिलेक्शन सर्व्हिसच्या विविध परीक्षांमध्ये लेखी परीक्षेला सवलत मिळून मध्ये थेट मुलाखतीला पात्र होता येते, तसेच अनेक खासगी कंपनीतील नोकरीसाठीही एनसीसी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येते. त्यामध्ये इंडिअन एअरलाईन्स, पवन हंस लिमिटेड, नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्प लिमिटेड, सहारा आदी कंपन्यांचा समावेश आहे.
--
दीपक होमकर
(लेखक एनसीसीसी प्रमाणपत्रधारक असून, लोकमतमध्ये उपसंपादक आहेत)