एनसीसीच्या विद्यार्थ्यांना देणार भूकंपातील सुरक्षिततचे प्रशिक्षण
By Admin | Published: May 2, 2015 05:34 AM2015-05-02T05:34:13+5:302015-05-02T05:34:13+5:30
देशाच्या कोणत्याही भागात भूकंप आला तर शाळांमधील मुलांचे जीव वाचविण्याची धुरा आता राष्ट्रीय छात्र सेवा (एनसीसी) विद्यार्थ्यांच्या खांद्यावर दिली जाणार आहे
पुणे : देशाच्या कोणत्याही भागात भूकंप आला तर शाळांमधील मुलांचे जीव वाचविण्याची धुरा आता राष्ट्रीय छात्र सेवा (एनसीसी) विद्यार्थ्यांच्या खांद्यावर दिली जाणार आहे. भूकंप आला तर त्या क्षणी सुरक्षिततेसाठी काय करावे, याचे प्रशिक्षण एनसीसीच्या विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर देशभरातील १४ लाख एनसीसी विद्यार्थी शाळांमध्ये जाऊन तेथे भूकंप आल्यासंदर्भातील मॉकड्रिल करणार आहेत.
नेपाळमध्ये नुकताच प्रलयकारी भूकंप आला. तो जेव्हा आला त्या वेळी विद्यार्थी शाळेत शिकत होते. भूकंपाच्या वेळी विद्यार्थ्यांना कुठे जावे, काय करावे, याची माहिती नसल्याने अनेक बालकांचा मृत्यू झाला. या भूकंपाचे धक्के उत्तर भारतातील राज्यांनाही बसले होते. तेथे भूकंपामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये बालकांचाही समावेश आहे. याची दखल संरक्षण मंत्रालयाने घेतली आहे. त्यामुळे भूकंप आल्यानंतर नेमके काय करावे, याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारे एनसीसीचे विद्यार्थी शाळांमध्ये असून, त्यांची संख्या मोठी असल्याने प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.