राष्ट्रवादीने स्वीकारले ईव्हीएम हॅक करण्याचे आव्हान
By admin | Published: May 28, 2017 04:03 AM2017-05-28T04:03:27+5:302017-05-28T04:03:27+5:30
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन हॅक करून दाखविण्याचे निवडणूक आयोगाने दिलेले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसने स्वीकारले आहे. मात्र त्यासाठी दिलेला चार तासांचा वेळ खूपच कमी
- लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन हॅक करून दाखविण्याचे निवडणूक आयोगाने दिलेले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसने स्वीकारले आहे. मात्र त्यासाठी दिलेला चार तासांचा वेळ खूपच कमी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़
पुणे महापालिका निवडणुकीनंतर पुणे शहरात भाजपा वगळता सर्वच राजकीय पक्षातील पराभूत उमेदवारांनी एकत्र येत ईव्हीएम मशीनविरोधात आंदोलने केली
होती़ थेट राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यापर्यंत तक्रारी करण्यात
आल्या होत्या़ जिल्हा न्यायालयात निवडणुकीतील निकालाविरोधात
८० हून अधिक दावे दाखल
करण्यात आले आहेत़ त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सर्वच पक्षांना ईव्हीएम हॅक करण्याचे आव्हान दिले होते. राष्ट्रवादीच्या वतीने अॅड. वंदना चव्हाण, गौरव जाचक, यासिन शेख यांनी हे आव्हान स्वीकारले आहे.
अॅड. चव्हाण म्हणाल्या, ‘चार तासांत कोणी हे मशीन हॅक करू शकत नाही. या कारणाने इतर कोणतेही पक्ष पुढे आले नाहीत. कोणी तज्ज्ञ या संदर्भात जबाबदारी घेत नसले तरी ईव्हीएम हॅक करण्याबाबत त्यांच्याकडून
आम्हाला माहिती मिळणार आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ईव्हीएममध्ये फेरफार होऊ शकतो का, याची तपासणी करण्यात येणार आहे. भाजपाने ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी
हा प्रयत्न करणार असल्याचे
त्यांनी सांगितले़