अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस उरले तरी वडगावशेरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी ' पोरका '
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 20:25 IST2019-10-02T20:07:39+5:302019-10-02T20:25:01+5:30
माजी आमदार बापू पठारे व नगरसेवक सुनील टिंगरे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणुक लढण्यास इच्छुक

अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस उरले तरी वडगावशेरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी ' पोरका '
पुणे: विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस उरले आहेत. मात्र, अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारांची नावे प्रसिध्द करण्यात आली नाहीत. त्यामुळे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघासह सर्वच मतदार संघातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. परंतु, बुधवारी रात्री उशीरा राष्ट्रवादीची उमेदवार यादी प्रसिध्द केली जाईल, असे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
वडगावशेरी मतदार संघातून भारतीय जनता पक्षातर्फे आमदार जगदीश मुळीक यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली असून येत्या गुरूवारी (दि.3) मुळीक निवडणुक अर्ज भरणार आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वडगावशेरीतून कोण निवडणुक लढवणार याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. माजी आमदार बापू पठारे व नगरसेवक सुनील टिंगरे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणुक लढण्यास इच्छुक आहेत. काही दिवसांपूर्वी दोघांची संयुक्तिक बैठक झाली. त्यात ज्याला पक्षाकडून उमेदवारी मिळेल,त्याच्यासाठी काम करायचे,असे दोघांमध्ये निश्चित झाले आहे. मात्र, निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास येत्या शुक्रवारपर्यंत (दि.4) मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्स्कूतचे वातावरण आहे.
वडगावशेरी विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची संख्या कमी आहे.त्यातच निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी उमेदवारांना फारच कमी दिवस मिळणार आहेत.परंतु,पक्षाकडून उमेदवारी जाहीर न झाल्याने आपल्याला कोणत्या उमेदवाराचा प्रचार करायचा आहे, याबाबत नगरसेवक व पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
----------
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे म्हणाले,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.पुण्यासह राज्यातील सर्वच मतदार संघातील उमेदवारांची यादी रात्री उशीरापर्यंत प्रसिध्द होण्याची शक्यता आहे.